अभियांत्रिकीवर प्रवेशाची दिवाळखोरी
By admin | Published: July 14, 2017 01:26 AM2017-07-14T01:26:03+5:302017-07-14T01:26:03+5:30
प्रतिष्ठेचा आणि नोकरीची हमी असलेला अभ्यासक्रम म्हणून ओळख असलेल्या अभियांत्रिकीवर प्रवेशाची दिवाळखोरी आली आहे.
रूपेश खैरी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : प्रतिष्ठेचा आणि नोकरीची हमी असलेला अभ्यासक्रम म्हणून ओळख असलेल्या अभियांत्रिकीवर प्रवेशाची दिवाळखोरी आली आहे. या अभ्यासक्रमात प्रवेश घेण्याकरिता विद्यार्थ्यांचा नकार येत असल्याने महाविद्यालये बंद पडण्याच्या मार्गावर आली आहेत. अभियांत्रिकीकरिता असलेल्या केंद्रियभूत प्रवेश प्रक्रियेचा दुसरा टप्पा पार पडला असून वर्धेतील तब्बल ६९ टक्के जागा रिक्त आहेत. हे अंतिम चित्र नसून चौथ्या फेरीनंतर रिक्त जागांचे खरे चित्र समोर येणार आहे.
विविध अभ्यासक्रमांची महाविद्यालये असलेल्या वर्धेची ओळख एज्युकेशन हब म्हणून होत असताना येथे शिष्यवृत्ती घोटाळ्याची मुळे रोवल्या गेली. परिणामी विद्यार्थ्यांचा येथील महाविद्यालयांवरचा विश्वास उडाला. प्रवेशाअभावी वर्धेत अभियांत्रिकी महाविद्यालयांची संख्या घटली. पूर्वी १० महाविद्यालये असलेल्या वर्धेत जुने सात एक नवे असे एकूण आठ महाविद्यालये आहेत. ही आठ महाविद्यालये मिळून केंद्रीयभूत प्रवेश प्रक्रियेतून एकूण २,३०७ जागा भरावयाच्या आहेत. केवळ अग्निहोत्री अभियांत्रिकी महाविद्यालय आणि आर.व्ही. पराडकर कॉलेज आॅफ इंजिनिअरींगने दोनच महाविद्यालयाने संस्थेचा कोटा ठेवला असून इतर महाविद्यालयांनी तो जमा केला आहे. एकीकडे तंत्रशिक्षण मंडळाने दिलेल्या जागा रिक्त असताना या व्यवस्थापन कोट्यात कोण प्रवेश घेईल अशी स्थिती आहे. या व्यवस्थापन कोट्याच्या माध्यमातून होत असलेल्या प्रवेशावरच शिष्यवृत्तीचा घोळ कायम आहे. आतापर्यंत एकूण ७१० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून तोही निश्चित नसल्याचे चित्र आहे.
महाकाली शिक्षण संस्थेचे दुसरे महाविद्यालयही बंद होण्याच्या मार्गावर
वर्धेत असलेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयांपैकी बाबुलालजी अग्निहोत्री कॉलेज आॅफ इंजिनिअरींग विद्यार्थ्यांच्या प्रवेशांअभावी बंद पडले आहे. आता याच कारणाने त्यांचे अग्निहोत्री कॉलेज आॅफ इंजिनिअरिंगही बंद पडण्याच्या मार्गावर आहे. या महाविद्यालयात २४० जागा असून केवळ १३ विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतला आहे. तर आर्वी येथील आर.व्ही. पराडकर कॉलेज आॅफ इंजिनिअरिंगमध्ये १९२ जागा असताना केवळ नऊच विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.
कमी प्रवेश असणाऱ्या महाविद्यालयांची गरज काय ?
जिल्ह्यात असलेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थी प्रवेश घेत नाही. अनेक महाविद्यालयात असलेल्या विद्यार्थी संख्येवरून तेथील प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांवर होणारा खर्च निघत असल्याचे दिसून आले आहे. यातही विशेष म्हणजे ज्या महाविद्यालयात प्रवेश कमी आहे त्याच महाविद्यालयात शिष्यवृत्ती घोटाळ्याची मुळे आहे.
इलेक्ट्रिकल टेलिकॉमची अवस्था दयनीय
अभियांत्रिकी अभ्यासक्रमात असलेल्या विविध शाखांपैकी इलेक्ट्रिकल टेलिकॉमची अवस्था दयनीय आहे. जिल्ह्यातील महाविद्यालयात या अभ्यासक्रमाच्या एकूण ३३३ जागा असून केवळ २७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. याची टक्केवारी केवळ ८ असून ९२ टक्के जागा रिक्त आहेत. यात शंकर प्रसाद अग्निहोत्री महाविद्यालयात या अभ्यासक्रमाच्या ६० जागा असून त्यात केवळ दोन विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. ओेम अभियांत्रिकी महाविद्यालयात शून्य, सुरेश देशमुख अभियांत्रिकी महाविद्यालयात एक, दत्ता मेघे ६० पैकी १६, अग्निहोत्री कॉलेज आॅफ अभियांत्रिकीत शुन्य, बजाज अभियांत्रिकी महाविद्यालयात आठ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.