वीजेच्या लपंडावाने उद्योजक अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2018 10:30 PM2018-11-04T22:30:50+5:302018-11-04T22:31:32+5:30

औद्योगिक क्षेत्रामध्ये चोवीस तास विद्युत पुरवठा करणे बंधनकारक असतानाही महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे वारंवार विद्युत पुरवठा खंडीत केल्या जात आहे. यामुळे उद्योगांना फटका बसत असल्याने महावितरणच्या अधीक्षक अभियंत्याकडे वारंवार तक्रार करुनही कानाडोळा केला जातो.

The entrepreneur's troubles on power hovering | वीजेच्या लपंडावाने उद्योजक अडचणीत

वीजेच्या लपंडावाने उद्योजक अडचणीत

Next
ठळक मुद्देएमआयडीसी : असोसिएशनच्या तक्रारीकडे अधीक्षक अभियंत्याचा कानाडोळा

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : औद्योगिक क्षेत्रामध्ये चोवीस तास विद्युत पुरवठा करणे बंधनकारक असतानाही महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे वारंवार विद्युत पुरवठा खंडीत केल्या जात आहे. यामुळे उद्योगांना फटका बसत असल्याने महावितरणच्या अधीक्षक अभियंत्याकडे वारंवार तक्रार करुनही कानाडोळा केला जातो. असा आरोप संतप्त एमआयडीसी असोसिएशन च्यावतीने करण्यात आला आहे.
ग्राहकांना सेवा पुरविण्यात अव्वल असल्याचा डांगोरा पिटणाऱ्या महावितरणचे अनेक तापदायक प्रकार उघडकीस येत आहे. सुरुवातील मीटरच्या तुटवड्याचा फटका ग्राहकांना सहन करावा लागला. तसेच तुटलेली विद्यूत जोडणी दुरुस्त करण्यासाठी महिनाभर शेतकºयांना प्रतिक्षा करावी लागते तर काही ठिकाणी वारंवार तक्रारीकरुनही महावितरणचे अधिकारी विद्युत चोरीला आळा न घालता सहकार्य करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. आता तर औद्योगिक क्षेत्रालाच महावितरणने अडचणीत आल्याचे तक्रारीअंती पुढे आले आहे. एमआयडीसी परिसरात चोवीस तास उद्योग सुरु राहत असल्याने येथे विद्युतही चोवीस तास पुरविणे अपेक्षीत आहे. परंतू एमआयडीसी परिसरात वारंवार उद्योजगांना विद्युत खंडणाचा त्रास सहन करावा लागतो. उद्योग बंद राहिला तर कामगार व उत्पादनातील नुकसानही उद्योजकांना सहन करावे लागतात. महावितरणच्या या हलगर्जीपणामुळे उद्योजकांना लाखो रुपयाचे नुकसान सहन करावे लागत असल्याची ओरड असोसिएशनकडून होत आहे. त्यामुळे वरिष्ठांनी याकडे लक्ष देऊन उद्योजकांची समस्या सोडविण्याची मागणी होत आहे.
तासभरात लाखोंचे नुकसान
एमआयडीसीतील उद्योजकांना रविवारी चांगलाच फटका सहन करावा लागला. दुपारी साडेबारा वाजतादरम्यान जवळपास एक तास विद्युत पुरवठा बंद राहिला. त्यामुळे परिसरातील सर्वच उद्योग ठप्प पडल्याने लाखो रुपयाचे नुकसान उद्योजकांना सहन करावे लागले. यासंदर्भात महावितरणडे तक्रार करुनही प्रश्न सुटत नसल्याने नागपूर येथील मुख्य अभियंत्याकडे तक्रार करण्यात आली आहे.
अधीक्षक अभियंत्याची मुख्यालयाला दांडी
रविवारी एमआयडीसी परिसरातील विद्यूत पुरवठा तासभरासाठी खंडीत करण्यात आल्याने एमआयडीसी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी अधीक्षक अभियंता सुनील देशपांडे यांना भेटण्यासाठी वेळ मागितला.पण,त्यांनी वेळ दिला नाही. तसेच मुख्य अभियंता घुगल यांनाही फोन केला असता प्रतिसाद दिला नसल्याचे असोसिएशनकडून सांगण्यात आले. आज सुटीचा दिवस असल्याने अधिकारी मुख्यालयी नव्हते. त्यांनी भ्रमणध्वनीवर प्रतिसाद देणे अपेक्षीत होते. परंतु तसे केले नसल्याने तक्रार कुणाकडे करावी, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला.
उद्योगांचा कारभार हा वीजेवरच अवलंबून आहे. त्यासाठी उद्योजक लाखो रुपयाचे देयकही अदा करतात.परंतु तरीही उद्योजकांना दररोज वीजेच्या लपंडावाचा सामना करावा लागतो. तसेच विद्युत देयकही वेळेवर मिळत नसल्याने उद्योजकांना नाहक भुर्दंड सहन करावा लागतो. आधीच मंदीचा काळ असतांना विद्युत वितरणच्या भोंगळ कारभारामुळे नुकसान सहन करावे लागत असल्याने उद्योग बंद पडण्याची स्थिती निर्माण झाली आहे.
अधीक्षक अभियंता संपर्क क्षेत्राबाहेर
एमआयडीसीतील अडचणींबाबत माहिती जाणून घेण्यासाठी महावितरणचे अधीक्षक अभियंता सुनील देशपांडे यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांचा भ्रमणध्वनी संपर्क क्षेत्राबाहेर असल्याचे सांगत होता.

वीजेचा लपंडाव हा नेहमीचाच झाला आहे. या महिन्यात आठवेळा विद्यूत पुरवठा खंडीत झाल्याने उद्योजकांना नुकसानीचा सामना करावा लागता. माझ्या एकट्याचे ८० हजार रुपयांचे नुकसान झाले असून या एमआयडीसीत दीडशेच्या आसपास उद्योजक आहेत. त्यामुळे लाखोंचे नुकसान सहन करावे लागत आहे. याबाबत वारंवार तक्रार करुनही अधीक्षक अभियंता देशपांडे लक्ष देत नाही. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी.
- प्रवीण हिवरे, अध्यक्ष एमआयडीसी असोसिएशन, वर्धा

Web Title: The entrepreneur's troubles on power hovering

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :electricityवीज