सायकल यात्रेतून आरोग्यासह पर्यावरणाचा संदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2021 05:00 AM2021-11-01T05:00:00+5:302021-11-01T05:00:07+5:30
जग बदलले आहे. सर्व सुखसोयी पायाजवळ आहेत. गरजाही पूर्ण होत आहे. असे असले तरी खरी संपत्ती आरोग्य आणि पर्यावरण मात्र, आपल्यापासून दूर जात आहे. याचे रक्षण हेच आपल्या सुखी जीवनाचे आणि भविष्याचे गमक असल्याने सायकलचा जास्तीतजास्त उपयोग करून आपण आपले आरोग्य चांगले ठेवू शकतो. पर्यावरणाचे संरक्षण आणि होणारा ऱ्हास टाळू शकतो.
लोकमत न्यूज नेटवर्क
सेवाग्राम : सायकल चालवा, आपले आरोग्य आणि पर्यावरण चांगले ठेवा, असा संदेश सायकल चालवण्यातून यवतमाळ येथील तीन युवक देत आहे. रविवारी यवतमाळ येथून सायकलने महात्मा गांधींच्या आश्रमात येऊन नवी ऊर्जा व प्रेरणा घेऊन सायकलस्वार यवतमाळकडे रवाना झाले.
जग बदलले आहे. सर्व सुखसोयी पायाजवळ आहेत. गरजाही पूर्ण होत आहे. असे असले तरी खरी संपत्ती आरोग्य आणि पर्यावरण मात्र, आपल्यापासून दूर जात आहे. याचे रक्षण हेच आपल्या सुखी जीवनाचे आणि भविष्याचे गमक असल्याने सायकलचा जास्तीतजास्त उपयोग करून आपण आपले आरोग्य चांगले ठेवू शकतो. पर्यावरणाचे संरक्षण आणि होणारा ऱ्हास टाळू शकतो.
पेट्रोलवर होणारा अनावश्यक खर्चही टाळता येतो. यातून एक ना अनेक फायदे होत असल्याने सायकल चालवण्याचा संदेश आम्ही या प्रवासातून देत असल्याची माहिती प्रफुल्ल सालुंके, सुरेश भुसांगे व लियाकत हुसैन यांनी दिली.
प्रफुल्ल व लियाकत हे दोघे फिटनेस ट्रेनर असून सुरेश हे इलेक्ट्रॉनिक व्यावसायिक आहे.
तिघेही ३५ ते ५१ वर्षे वयोगटातील आहे. मागील तीन वर्षांपासून ते नियमित बापूकुटीला भेट देऊन नतमस्तक होतात. मार्गदर्शिका संगीता चव्हाण यांच्याशी त्यांनी संवाद साधला. तिघांनी यवतमाळ ते सेवाग्राम असा ६८.७६ कि.मी. अंतराचा पल्ला अवघ्या २ तास ४८ मिनिटे ४८ सेकंदांत पूर्ण करून नागरिकांमध्ये आरोग्यासह पर्यावरणाबाबत जनजागृतीपर संदेश दिला. यावेळी सायकलस्वारांनी आश्रमातील स्मारकांना भेट देत माहितीही जाणून घेत आश्रम परिसराची पाहणी देखील केली.