दिवाळीच्या तोंडावर ‘लालपरी’चे सहकारी संपावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2021 05:00 AM2021-10-29T05:00:00+5:302021-10-29T05:00:20+5:30
जोपर्यंत मागण्या पूर्णत्वास जाणार नाही, तोपर्यंत संपा मागे घेतला जाणार नाही. असा निर्धार केल्याने दुपारपासून जिल्ह्यातील पाचही आगारातील बसफेऱ्या ठप्प पडल्या आहेत. ऐन दिवाळीच्या दिवसांमध्येच एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने लालपरी आगारात उभी केली आहे. सकाळी काही बसफेऱ्या गेल्यात पण, दुपारनंतर सर्वच फेऱ्या बंद करण्यात आल्या. पाचही आगारातून दररोज जवळपास ८५० बसफेऱ्या होतात. आज दुपारी ४ वाजेपर्यंत ७०४ बसफेऱ्या ठप्प झाल्याने महामंडळाला १६ ते १७ लाखांचा फटका बसला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्या कित्येक दिवसापासून प्रलंबित आहेत. त्या पूर्ण व्हाव्या, याकरिता संघटनांकडून लढाही दिला जात आहे. अशातच शासनाकडून परिपत्रक काढण्यात आले. परंतु त्याची अंमलबजावणी होत नसल्याने सर्व कर्मचाऱ्यांच्या अडचणी कायम आहे. त्यामुळे न्याय मागण्यांकरिता राज्य परिवहन महामंडळ कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांनी एकत्र येत संयुक्त कृती समितीच्या माध्यमातून गुरुवापासून राज्यभरात संप पुकारला आहे.
जोपर्यंत मागण्या पूर्णत्वास जाणार नाही, तोपर्यंत संपा मागे घेतला जाणार नाही. असा निर्धार केल्याने दुपारपासून जिल्ह्यातील पाचही आगारातील बसफेऱ्या ठप्प पडल्या आहेत. ऐन दिवाळीच्या दिवसांमध्येच एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने लालपरी आगारात उभी केली आहे. सकाळी काही बसफेऱ्या गेल्यात पण, दुपारनंतर सर्वच फेऱ्या बंद करण्यात आल्या. पाचही आगारातून दररोज जवळपास ८५० बसफेऱ्या होतात. आज दुपारी ४ वाजेपर्यंत ७०४ बसफेऱ्या ठप्प झाल्याने महामंडळाला १६ ते १७ लाखांचा फटका बसला. अद्यापही कर्मचारी संपावरच असल्याने ही नुकसानीची आकडेवारी वाढण्याची शक्यता विभागीय नियंत्रक चेतन हसबनीस यांनी वर्तविली आहे.
या मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांचे आंदोलन
- वेतनवाढीचा दर ३ टक्के तर भत्तावाढ ८,१६,२४ नुसार लागू करावा. कर्मचाऱ्यांना वाढीव ५ टक्के महागाई भत्ता लागू करावा, ऑक्टोबर २०१९ पासूनचा १२ टक्के महागाई भत्ता देण्यात यावा. कर्मचाऱ्यांचे वेतन देय तारखेला नियमित करण्यात यावे. लॉकडाऊन काळातील कोविड भत्ता तातडीने द्यावा. कोरोनामुळे ३०० कर्मचाऱ्यांचा जीव गेला त्यांना न्याय द्यावा. जवळपास २५ कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली त्यामुळे योग्य दखल घ्यावी. ऑक्टोबर महिन्याचे वेतन दिवाळीपूर्वी देण्यात यावे. सण उचल रक्कम १२,५०० आणि दिवाळी भेट १४ हजार रुपये दिवाळीपूर्वी द्यावी.
- वर्धा : महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी वर्ध्यातील आगारासमोर आणि सेवाग्राम मार्गावरील विभागीय कार्यशाळेसमोर आंदोलनाला सुरुवात केली. सकाळी काही फेऱ्या सोडण्यात आल्या. पण, दुपारनंतर सर्व बसफेऱ्या बंद करण्यात आल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली. विशेषत: शाळा, महाविद्यालयात येणाऱ्या विद्यार्थ्यांची चांगलीच अडचण झाली. या संपात महाराष्ट्र एस.टी. कामगार संघटना, महाराष्ट्र एस.टी. कर्मचारी काँग्रेस, महाराष्ट्र एस.टी. कामगार सेना, महाराष्ट्र मोटर कामगार फेडरेशन व कास्ट्राईब रा.प. कर्मचारी संघटना सहभागी आहेत.
- हिंगणघाट : येथील आगारातील कर्मचाऱ्यांच्या संयुक्त कृती समितीने महात्मा गांधी व डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून उपोषणाला सुरुवात केली. सुरुवातील तुटपुंज्या वेतनापायी आत्महत्या केलेल्या २६ कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली वाहिली. हिंगणघाट परिवहन आगारात जवळजवळ ३५० कर्मचारी कार्यरत आहेत. त्यातील बहुतांश आज संपावर असल्याने पाचच बसेस निघाल्या. अचानक केलेल्या या संपामुळे बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची मोठी पंचाईत झाली.
- आर्वी/देऊरवाडा : कर्मचाऱ्यांनी आर्वी बसस्थानकात बेमुदत संप सुरू केला केला. तत्पूर्वी सकाळपासून साडेदहा वाजेपर्यंत ३० टक्के बसफेऱ्या गेल्या होत्या. त्यानंतर बसफेऱ्या बंद करण्यात आल्या. या संपामुळे विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागला. परीक्षा असल्याने विद्यार्थी आज शाळेत आले होते. संपामुळे सायंकाळपर्यंत त्यांना ताटकळत राहावे लागले. काहींनी पालकांना बोलावून घेतले तर काहींनी खासगी वाहनाने गाव गाठले. आमदारांसह लोकप्रतिनिधींनी उपोषण मंडपाला भेट देऊन कामगारांच्या समस्या जाणून घेतल्या.
- तळेगाव(श्या.पंत): येथील आगारातील कर्मचाऱ्यांनी सकाळपासून उड्डाणपुलाखाली उपोषणाला सुरुवात केली. एकीकडे या उपोषण मंडपात हळूहळू कर्मचाऱ्यांची गर्दी वाढत असताना आगारात बसगाड्यांची संख्या वाढत होती. दिवाळीच्या तोंडावर प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली. लांबपल्ल्याच्या काही बसेस सुरू असल्याने त्यांना जागेअभावी बसस्थानकामध्ये बस टाकता आली नाही. परिणामी, राष्ट्रीय महामार्गावर उभ्या करून प्रवाशांची चढ-उतार करण्यात आली.