दिवाळी आटोपली तरीही रवा, डाळ, साखर, तेलाची ‘किट’ मिळेना!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2022 09:53 PM2022-10-27T21:53:26+5:302022-10-27T21:54:17+5:30
शासनाच्या मर्जीतील असलेल्या नागपुरातील या कंत्राटदाराने येथेही आपली मनमर्जी चालविली. वेळेमध्ये किट उपलब्ध करून न दिल्याने या चांगल्या योजनेला खीळ बसली असून पुरता बोजवारा उडाला आहे. जिल्ह्याकरिता केवळ १ लाख ९१ हजार १७६ किट प्राप्त झाल्या असून त्याही एकत्र न देता एक-एक वस्तू उपलब्ध करून दिल्या. त्यामुळे सार्वजनिक वितरण व्यवस्थेची डोकेदुखी वाढली. यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : राज्यभरातील सर्वसामान्य शिधापत्रिकाधारकांची दिवाळी गोड व्हावी म्हणून शासनाने शंभर रुपयांत रवा, डाळ, साखर आणि तेल या वस्तूंचा ‘आनंदाचा शिधा’ देण्याचा निर्णय घेतला. हा शिधा दिवाळीपूर्वी लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक होते. परंतु कंत्राटदाराने आवश्यक तेवढ्या किट सार्वजनिक वितरण व्यवस्थेला उपलब्ध करून न दिल्याने अनेकांना अर्धी दिवाळी आटोपल्यावर तर काहींना दिवाळी आटोपल्यानंतरही लाभ मिळविण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.
शासनाने सार्वजनिक वितरण व्यवस्थेव्दारे अंत्योदय गट, प्राधान्य कुटुंब आणि एपीएल शेतकरी शिधापत्रिकाधारकांना नियमित आणि पाच किलो मोफत धान्यासोबतच केवळ शंभर रुपयांत चार वस्तू असलेला ‘आनंदाचा शिधा’ देण्याचा निर्णय घेतला. जिल्ह्यामध्ये या योजनेस पात्र असलेले २ लाख ८५ हजार ३६० शिधापत्रिकाधारक असून तेवढ्या किट कंत्राटदाराने दिवाळीपूर्वीच उपलब्ध करून देणे बंधनकारक होते. पण, शासनाच्या मर्जीतील असलेल्या नागपुरातील या कंत्राटदाराने येथेही आपली मनमर्जी चालविली. वेळेमध्ये किट उपलब्ध करून न दिल्याने या चांगल्या योजनेला खीळ बसली असून पुरता बोजवारा उडाला आहे. जिल्ह्याकरिता केवळ १ लाख ९१ हजार १७६ किट प्राप्त झाल्या असून त्याही एकत्र न देता एक-एक वस्तू उपलब्ध करून दिल्या. त्यामुळे सार्वजनिक वितरण व्यवस्थेची डोकेदुखी वाढली. यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
१००रुपयांत दिवाळीचे किट
सर्वसामान्यांची दिवाळी गोड करण्यासाठी शासनाने ‘आनंदाचा शिधा’ असलेल्या चार वस्तूंची किट शंभर रुपयांमध्ये उपलब्ध करून दिली आहे. यामध्ये रवा, साखर व चणाडाळ प्रत्येकी एक किलो आणि पामतेल एक लीटर देण्यात येत आहे.
अर्धी दिवाळी झाल्यावर मिळाली साहित्याची किट
दिवाळी गोड व्हावी या उद्देशाने चार वस्तू असलेला ‘आनंदाचा शिधा’ स्वस्त धान्य दुकानातून देण्याचा निर्णय घेतला. दिवाळीपूर्वी स्वस्त धान्य दुकानामध्ये ‘आनंदाचा शिधा’ पोहोचून वितरण होणे अपेक्षित होते. परंतु कंत्राटदाराने वेळेत या वस्तूंचा पुरवठा केला नाही. परिणामी अनेकांना अर्धी दिवाळी झाल्यावर किट देण्यात आली. तर काहींना अद्यापही ही किट मिळाली नसल्याचे चित्र दिसून येत आहे.
कोणाला मिळणार होते?
सार्वजनिक वितरण व्यवस्थेव्दारे दिला जाणारा ‘आनंदाचा शिधा’ हा प्राधान्य कुटुंब गट, अंत्योदय कुटुंब आणि शेतकरी कुटुंबांना दिला जाणार आहे. प्रत्येक शिधापत्रिकाधारकांना एक किट दिली जात आहे.
जिल्ह्यात २ लाख ८५ हजार लाभार्थी
- जिल्ह्यामध्ये आठही तालुक्यात एकूण ३ लाख ६ हजार ८२ शिधापत्रिकाधारक असून यातील अंत्योदय, प्राधान्य कुटुंब व शेतकरी कुटुंबातील शिधापत्रिकाधारकांनाच ‘आनंदाचा शिधा’ देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. त्यामुळे या तिन्ही गटांमध्ये २ लाख ८५ हजार ३६० लाभार्थी असून त्यांना किट पुरवठा करण्याची जबाबदारी सार्वजनिक वितरण व्यवस्थेवर आहे. पण, दिवाळी आटोपली तरीही कंत्राटदाराने जिल्ह्यात पुरेशा किट व वस्तू उपलब्ध करुन दिल्या नाहीत. त्या कधी मिळेल याची प्रतीक्षा आहे.
लाभार्थी काय म्हणतात...
शासनाने दिवाळी गोड करण्याकरिता ही चांगली योजना राबविली. परंतु आम्हाला दिवाळीपूर्वी हा आनंदाचा शिधा देणे आवश्यक होते. माहिती मिळाल्यानंतर दिवाळीपूर्वी स्वस्त धान्य दुकानात गेल्यावर अजून किट यायची आहे, असेच सांगण्यात आले. त्यामुळे माघारी यावे लागले आणि दिवाळी झाल्यानंतर ही किट उपलब्ध झाली.
नीलेश गाडेकर, लाभार्थी
शासनाने या योजनेचा नेहमीप्रमाणेच मोठा गाजावाजा केला. पण, स्वस्त धान्य दुकानांमध्ये किटच उपलब्ध नसल्याने शिधापत्रिकाधारकांना हेलपाटे मारावे लागत आहेत. मीच दोन ते तीन वेळा दुकानात गेल्यानंतर शंभर रुपयाची किट मिळाली. योजना चांगल्या असतात, पण चकरा मारायला लावणे योग्य नाही.
अक्षय गवळी, लाभार्थी
शासनाने नियमित धान्य, मोफतचे धान्य यासोबतच शंभर रुपयांमध्ये ‘आनंदाचा शिधा’ देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आनंदाच्या शिधा किटची मागणीही शासनाकडे करण्यात आली. जिल्ह्याला २ लाख ८५ हजार ३६० किटची आवश्यकता असताना आतापर्यंत केवळ १ लाख ९१ हजार १७६ किट प्राप्त झाल्या. त्यापैकी १ लाख २१ हजार ५३२ किटचे वाटप पूर्ण झाले असून अजूनही वाटप सुरूच आहे. विजय सहारे, जिल्हा पुरवठा अधिकारी