नोटीसनंतरही ३३ शिकस्त इमारती उभ्याच
By admin | Published: July 23, 2016 02:34 AM2016-07-23T02:34:33+5:302016-07-23T02:34:33+5:30
शहरातील ३३ शिकस्त इमारतींना पालिका प्रशासनाद्वारे अनेकवार नोटीस बजावण्यात आली आहे.
पावसाच्या दिवसांत दुर्घटनेची शक्यता : पालिका बजावू शकते केवळ नोटीस
पराग मगर वर्धा
शहरातील ३३ शिकस्त इमारतींना पालिका प्रशासनाद्वारे अनेकवार नोटीस बजावण्यात आली आहे. दर पावसाळ्यात ही नोटीस दिली जाते. पण यातील एकही इमारत मालकाकडून या नोटीसींकडे दुर्लक्ष होत आहे. शिकस्त झालेल्या या इमारतीच्या डागडुजीकडे किंवा त्या पाडण्याकडे त्यांच्याकडून कोणतीही कार्यवाही करण्यात आली नसून त्या तशाच उभ्या आहेत. उभ्या असलेल्या इमारतींपैकी बऱ्याच इमारतीत भाडेकरी असल्याने त्यांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
शिकस्त झालेल्या बऱ्याच इमारती शहरातील बाजार परिसरात आहे. त्या इमारतींच्या पायथ्यांशी अनेक छोटी दुकाने आहे. वर्धेतील पत्रावळी चौक परिसरात पावसाळ्याच्या दिवसात शिकस्त इमारतीची भिंत कोसळल्याने एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घटना काही वर्षांपूर्वी घडली आहे. असे असताना ती इमारत आजही तशीच उभी आहे. यामुळे पावसाळ्याच्या दिवसात शिकस्त झालेली एखादी इमारत कोसळून दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशी घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
शहरातील शिकस्त इमारती दरवर्षी वाढत आहे. गरवर्षी ३१ असलेला शिकस्त इमारतींचा आकडा या पावसाळ्यात ३३ वर गेला. पालिका प्रशासनाद्वारे यंदाही सर्वांना सदर घरे पाडण्याबाबत नोटीस बजावली आहे. पण यातील एकाही घरमालकाने ही बाब मनावर न घेतल्याने शिकस्त इमारती तश्याच पडक्या स्थितीत उभ्या आहेत. शहरातील नागरिकांना शहरात वावरताना कसलीही भीती वाटू नये यासाठी अश्या शिकस्त इमारती पाडण्याबाबत घरमालकाला सूचित केले जाते. विशेष म्हणजे पालिका प्रशासन स्वत: शी घरे पाडण्याची कारवाई करू शकत नाही. याचाच फायदा घेत घरमालक इमारती शिकस्त इमारती पाडण्यास तयात नाही. यामुळे धोक्याची तलवार शहरातील नागरिकांच्या डोक्यावर कायम आहे. उद्या एखादा अपघात झाल्यास त्यास जबाबदार होण असा प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे. वारंवार नोटीस बजावूनही या शिकस्त इमारती पाडत नसलेल्या घरमालकांवर कारवाई करावी अशी मागणी सुज्ञ नागरिक करीत आहेत.
शिकस्त इमारतींखालीच बाजार
शहरातील बाजार परिसरात असलेल्या या इमारतींखालीव वर्धेचा बाजार भरत असल्याचे चित्र आहे. यामुळे अशा इमारतींमुळे धोका उद्भवण्याची शक्यता आहे. याकडे इमारत मालकांनी लक्ष देणे गरजेचे आहे.
शिकस्त इमारती पाडण्याकरिता पालिकेच्यावतीने इमारत मालकांना नोटीसी बजावण्यात आल्या आहेत. त्यावर निर्णय घेण्याची जबाबदारी घरमालकांची आहे. घर पाडण्याचे काम पालिकेला करणे नियमानुसार शक्य नाही.
- अजय बागरे, प्रशासकीय अधिकारी, न.प. वर्धा.
शहरातील या शिकस्त इमारतीत अनेक घरांमध्ये भाडेकरू राहतात. घरमालक दुसरीकडे राहत असल्याने ते याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे अशा घरांचा कर भरण्यात येत नाही. ज्या घरात मालकांचे वास्तव्य आहे, त्यांच्याकडून नियमित कराचा भरणा होत असल्याचे पालिकेकडून होत असल्याचे सांगण्यात आले आहे.
अशा इमारतींची संख्या वाढीवरच असल्याचे दिसून आले आहे. गत वर्षी शहरात शिकस्त इमारती म्हणून ३१ इमारतींची नोंद होती. यंदा तो आकडा ३३ वर पोहोचला आहे. हा आकडा असाच वाढत जाण्याची शक्यता पालकेच्यावतीने वर्तविण्यात आली आहे. यामुळे घरमालकांनी त्यांच्या मालमत्तेची काळजी घेणे गरजेचे झाले आहे.
या खासगी मालकीच्या असल्याने पालिकेकडून कारवाईच्या नावावर केवळ नोटीसच बजावू शकते. ती पाडण्याची जबाबदारी त्या इमारत मालकांनाच सांभाळावी लागत आहे. यामुळे त्यांनी दुर्घटना घडण्यापूर्वी यावर त्यांनीच निर्णय घेणे गरजेचे असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे.