आदेशानंतरही ग्रामदूत केंद्र सुरूच
By admin | Published: March 24, 2017 01:58 AM2017-03-24T01:58:58+5:302017-03-24T01:58:58+5:30
आंजी (मोठी) येथील ग्रामदूत केंद्राविरोधात प्राप्त तक्रारीवरुन जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करुन महा ई-सेवा केंद्र ब्लॉक करण्याचे आदेश दिले.
महा ई-सेवा केंद्र ब्लॉक करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
आकोली : आंजी (मोठी) येथील ग्रामदूत केंद्राविरोधात प्राप्त तक्रारीवरुन जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करुन महा ई-सेवा केंद्र ब्लॉक करण्याचे आदेश दिले. या आदेशानंतरही येथील केंद्र सुरूच आहे. याची दखल घेत कार्यवाही करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
रेशन कार्ड तयार करण्यासाठी दोनशे रूपयाची लाच मागितली, म्हणून विकास शंकर गोमासे यांनी ग्रामदुतचे किरण भावस्कर यांच्या विरोधात २५ जानेवारीला तक्रार दिली. जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त तक्रारीची चौकशी करुन यात सत्यता आढळल्याने १५ मार्च २०१७ ला महा ई-सेवा केंद्र ब्लॉक करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. मात्र या आदेशाची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही.
विकास गोमासे यांनी रेशन कार्ड नुतनीकरण करण्यासाठी दिले होते. नियमाप्रमाणे त्यांना ३३ रूपये खर्च लागत असताना भावरकर यांनी २०० रूपयांची मागणी केली होती. मागणी पूर्ण न केल्याने गोमासे यांचे रेशन कार्ड ग्रामदूतमध्ये अडकून पडले होते. या सर्व बाबींचे गोमासे यांनी छायाचित्रण करुन जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. या प्रकरणाची चौकशी मे. एनएसपी फ्युचरटेकचे जिल्हा समन्वयक प्रतिक उमाटे यांना करण्याचे आदेश दिले होते. चौकशी अहवालातून आंजी (मोठी) येथील महा ई-सेवा केंद्र ब्लॉक करण्याचे आदेश निवासी उपजिल्हाधिकारी मंगेश जोशी यांनी दिले. युआयडी किट (लॅपटॉप, आयरीस स्कॅनर, थंबस्कॅनर, एलसीडी मॉनीटर, मल्टीफंक्शनल प्रिंटर, वेब कॅमेरा) कार्यालयाकडे सुपूर्द करण्याचे आदेशात नमुद आहे याची दखल घेण्याची मागणी आहे.(वार्ताहर)