'प्रकल्प प्रेरणा'नंतरही जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2024 05:43 PM2024-09-23T17:43:14+5:302024-09-23T17:43:37+5:30

आठ महिन्यात ४८ आत्महत्या : ३४ हजार शेतकऱ्यांवर समुपदेशन सुरू

Even after 'Prerna Prakalp', farmers' suicides continue in the district | 'प्रकल्प प्रेरणा'नंतरही जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच

Even after 'Prerna Prakalp', farmers' suicides continue in the district

चेतन बेले 
लोकमत न्यूज नेटवर्क 
वर्धा :
जिल्हा शेतकरी आत्महत्याग्रस्त म्हणून ओळख निर्माण झाली आहे. यावर उपाय म्हणून राज्य शासनाने प्रकल्प प्रेरणा सुरू केला. या अंतर्गत जिल्ह्यात ३४ हजार शेतकऱ्यांवर समुपदेशन सुरू आहे. असे असले तरी गत आठ महिन्यात ४८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याने प्रकल्प कुचकामी ठरत असल्याचे दिसून येत आहे.


जिल्ह्यात वर्ष २००१ ते २०२४ या कालावधीत २ हजार ४४२ जणांनी आत्महत्या केल्या. त्यात अंतिम अहवालात केवळ १ हजार २२२ शेतकरी पात्र ठरले. शेतकऱ्यांचा वाढत्या आत्महत्या लक्षात घेत वर्ष नोव्हेंबर २०१५ मध्ये प्रकल्प प्रेरणा सुरू केला. त्यात जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने मानसोपचार तज्ज्ञांचे पथक तयार करण्यात आले. शेतकऱ्यांच्या गृहभेटीतून त्याच्या समस्या जाणून घेत आत्महत्येचे विचार मनात डोकावण्याच्या कारणांचा शोध घेण्यात आला. यात नैराश्यग्रस्त, असलेले नैराश्यात व्यसनाधीनतेच्या आहारी गेलेले, मानसिक आजाराने ग्रस्त व अन्य आजाराने पीडित अशा शेतकऱ्यांचा शोध घेण्यात आला. जिल्ह्यात जुलै २०२३ ते जुलै २०२४ पर्यंत ३४ हजार ३३५ शेतकऱ्यांवर समुपदेशन केले जात आहे. तर ८९२ शेतकऱ्यावर समुपदेशनासह औषधोपचार करण्यात येत आहे. 


महिन्याकाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात २ हजार ७०० ते तीन हजार जनांना समुपदेशन केले जाते. शिवाय गृहभेटीच्या माध्यमातून समुपदेशनासह औषधोपचार केले जात असल्याचे जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून सांगण्यात आले आहे. समुपदेशनात जिल्हा देशात सातव्या स्थानी तर राज्यात दुसऱ्या स्थानावर असल्याचेही सांगण्यात आले. समुपदेशन प्रकल्पाला सुरूवात केल्यानंतर शेतकरी आत्महत्या कमी झाल्याचे आकडेवारीवरून दिसून आले आहे. 


आत्महत्येमागची प्रमुख कारण 
शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कायमस्वरूपी नसलेले धोरण. कर्जबाजारीपणा, व्यसनाधिनता, दृष्काळ, नापिकी, अपुरे सिंचन, अपुरा वित्त पुरवठा, कर्जावरील बेहिशेबी व्याज, सावकारी जाच, कुटुंब कलह, वाढती महागाई, कोसळणारे बाजारभाव, आर्थिक चणचण, ओढाताण, बोझा व उद्याची चिंता या गोष्टी शेतकरी आत्महत्येला कारणीभूत आहेत. 


अर्धा जिल्हा अति जोखमीचा 
आठ तालुक्याचा वर्धा जिल्हा, त्यात सगळ्यात जास्त आत्महत्या होत असलेल्या शेतकऱ्यांत जिल्ह्यातील चार तालुक्यांचा समावेश आहे. यात आर्वी, आष्टी, हिंगणघाट, आणि कारंजाचा समावेश आहे.


५८ जणांचे केले डेथ ऑडिट
समुपदेशन, औषधोपचार सुरु असताना बऱ्याच शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची बाब समोर आले आहे. जुलै २०२३ ते जुले २०२४ पर्यंत ५८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. या शेतकऱ्यांचे जिल्हा सामान्य रुग्णाल- याकडून डेथ ऑडिट करण्यात आले आहे. यात मृत्यूच्या कारणांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. 


"समुपदेशन व औषधोपचारासाठी टीम नेमण्यात आली आहे. आठवड्यातून दोन दिवस गृहभेटी देण्यात येते. यात एक दिवस समुपदेशन तसेच एक दिवस औषधोपचार करण्यात येतो." 
- डॉ. सुदर्शन हरले, मानसोपचार तज्ज्ञ, जिल्हा सामान्य रुग्णालय वर्धा.


शेतकरी आत्महत्येचा ओसरता आलेख
वर्ष २०१३ पासून शेतकरी आत्महत्या पाहिल्या तर पात्र ठरलेल्यांमध्ये २०१३ मध्ये ७७, वर्ष २०१४ मध्ये ११०, वर्ष २०१५ मध्ये १३९, वर्ष २०१६ मध्ये ९३ आत्महत्या शेतकऱ्यांनी केल्या. मात्र त्यानंतर शेतकरी आत्महत्येत घसरण झाली. वर्ष २०१७ मध्ये ७६, वर्ष २०१८ मध्ये ७१ वर्ष २०१९ मध्ये ६३, वर्ष २०२० मध्ये ५३, वर्ष २०२१ मध्ये ५६, वर्श २०२२ मध्ये ७७, वर्श २०२३ मध्ये ४३ तर वर्ष २०२४ मध्ये हा आकडा ४८ वर आला आहे. प्रकल्पामुळे आत्महत्यांचे प्रमाण कमी झाले आहे.

Web Title: Even after 'Prerna Prakalp', farmers' suicides continue in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.