शिवसंपर्क अभियानापूर्वीच शिवसेनेतील वाद चव्हाट्यावर, माजी उपजिल्हाप्रमुखाने केली विश्रामगृहात तोडफोड
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2022 05:26 PM2022-03-22T17:26:32+5:302022-03-22T17:27:16+5:30
Shiv Sena News: शिवसंपर्क अभियानाच्या पूर्वतयारीसाठी मुंबई येथून आलेल्या पदाधिकाऱ्यांच्या समोरच शिवसेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख तुषार देवढे यांनी कार्यकर्त्यांसह विश्रामगृहात अनाधिकृतपणे प्रवेश करुन पदाधिकाऱ्यांना शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली.
वर्धा - शिवसंपर्क अभियानाच्या पूर्वतयारीसाठी मुंबई येथून आलेल्या पदाधिकाऱ्यांच्या समोरच शिवसेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख तुषार देवढे यांनी कार्यकर्त्यांसह विश्रामगृहात अनाधिकृतपणे प्रवेश करुन पदाधिकाऱ्यांना शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच विश्रामगृहातील शासकीय मालमत्तेची तोडफोड केली. याप्रकरणी माजी खासदार अनंत गुढे यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
शिवसेनेच्या वतीने २२ ते २५ मार्च या कालावधीत शिवसेना संपर्क मोहिम हे अभियान राबविण्यात येत आहे. यासाठी मंगळवारी येथील विश्रामगृहात मुंबई येथून शिवसेना संपर्क प्रमुख आणि काही पदाधिकारी दाखल झाले होते. मात्र, शिवसेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख तुषार देवढे हे आपल्या कार्यकर्त्यांसह विश्रामगृहात दाखल झाले त्यांनी विधानसभा संपर्क प्रमुख गणेश टोणे आणि जिल्हाप्रमुखांशी बाचाबाची करुन शाब्दिक वाद करीत जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच त्यांनी व त्यांच्यासोबत आलेल्यांनी विश्रामगृहातील साहित्याची तोडफोड करुन शासकीय मालमत्तेचे नुकसान केले. यामुळे त्यांच्यावर कारवाई करुन त्यांना अटक करावी, अशी तक्रार माजी खासदार अनंत गुढे यांनी शहर पोलिसात दिली.
रिवॉल्वर रोखून दिली धमकी
तुषार देवढे हे विश्रामगृहात दाखल झाले असता त्यांच्या हातात रिवॉल्वर होती. त्यांनी रिवॉल्वरचा धाक दाखवून मीच अजून पदावर कायम आहे, असे म्हणत शिवीगाळ करुन उपस्थित पदाधिकाऱ्यांना शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याचा उल्लेख दिलेल्या तक्रारीत करण्यात आलेला आहे हे विशेष.