कोरोनाकाळातही देवळीच्या ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची उपेक्षा कायमच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 05:00 AM2021-05-24T05:00:00+5:302021-05-24T05:00:16+5:30
कोरोनाकाळात येथील ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन बेडची व्यवस्था नसल्याने ऑक्सिजनची पातळी कमी झालेल्या रुग्णांना गंभीर अवस्थेत जिल्ह्याच्या ठिकाणी हलविताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. येथील सुविधांअभावी कार्यरत वैद्यकीय अधिकाऱ्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागते. सध्या रुग्णालयात तीन ऑक्सिजन कॉन्सट्रेटर प्राप्त झाले असून त्याची ट्रायल सुरु आहे.
हरिदास ढोक
लोकमत न्यूज नेटवर्क
देवळी : येथे ग्रामीण रुग्णालयाची सुसज्ज इमारत असून गेल्या सात वर्षांपासून सोयी-सुविधांचा अभाव आणि अल्प मनुष्यबळ असल्याने रुग्णांच्या उपचारापासून तर दाखल करुन घेण्यापर्यंत अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. या कोरोनाच्या महामारीतही गेल्या वर्षभरात येथे ना रुग्णवाहिका मिळाली ना ऑक्सिजन सिलिंडरचा आवश्यक पुरवठा झाला. त्यामुळे रुग्णांची उपेक्षा अद्यापही कायमच आहे.
कोरोनाकाळात येथील ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन बेडची व्यवस्था नसल्याने ऑक्सिजनची पातळी कमी झालेल्या रुग्णांना गंभीर अवस्थेत जिल्ह्याच्या ठिकाणी हलविताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. येथील सुविधांअभावी कार्यरत वैद्यकीय अधिकाऱ्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागते. सध्या रुग्णालयात तीन ऑक्सिजन कॉन्सट्रेटर प्राप्त झाले असून त्याची ट्रायल सुरु आहे. या रुग्णाला कोरोनाबाधितांना दाखल करुन घेण्याची तरतूद नसल्याने येथे व्हेंटिलेटरची व्यवस्था नसल्याचे सांगण्यात आले आहे.
रुग्णालयात सुरुवातीपासून मनुष्यबळाचा तुटवडा आहेत. शासनाच्या आराखड्यानुसार येथे वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या २७ जागा मंजूर असताना सध्या १३ कर्मचाऱ्यांच्या भरोवश्यावर रुग्णालयाचा डोलारा सांभाळल्या जात आहे. सहाय क अधीक्षक, दंतचिकित्सक, दोन कनिष्ठ लिपिक, दोन अधिपरिचरिका, चार वॉर्डबॉय, दंतचिकित्सक सहायक, शिपाई व दोन सफाई कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. रुग्णालयात साधी जनरेटरचीही व्यवस्था नसल्याने लाईट गेल्यानंतर संपूर्ण परिसरात काळोख पसरतो. परिणामी सर्व विद्युत उपकरणे या काळात निकामी ठरतात. येथील कालबाह्य एक्सरे मशीनच्या अनेक तक्रारी असल्याने शंभर मिली अॅम्पीयरची नवीन एक्सरे मशीन सेवेत आणली. या मशीनमध्ये मणक्याचे एक्सरे स्पष्ट येत नसल्याने पाचशे मिली अॅम्पीयरच्या मशीनची मागणी आहे. तसेच पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी मिळत नसल्याने रुग्ण कल्याण समिती व त्यामार्फत चालणारे सर्व काम थांबलेले आहे.
या व्यवस्थेवर दिला जातोय भर
कोरोनाच्या तिसºया लाटेची पूर्वतयारी म्हणून ऑक्सिजन पातळी कमी झालेल्या रुग्णांची जिल्ह्याच्या ठिकाणी दाखल होण्याची व्यवस्था होईपर्यंत या रुग्णालयात ऑक्सिजन लावण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. याकरिता नऊ सिलिंडर, तीन ऑक्सिजन कॉन्सट्रेटरसह आयसोलेशन वॉर्डाची निर्मिती केली आहे.
स्थानिक औद्योगिक वसाहतीतील सामाजिक न्याय भवन येथे ५० बेडचे समर्पित कोविड आरोग्य केंद्र प्रस्तावित आहे. याठिकाणी ऑक्सिजन बेडची व्यवस्था राहणार आहे. ऑक्सिजन पातळी ९० ते ९४ पर्यंत असणाºया रुग्णांना येथे दाखल केले जाणार आहे. त्यांच्या सेवेत ३ वैद्यकीय अधिकारी व परिचारिका राहणार असून गंभीर रुग्णांन हलविण्यासाठी रुग्णवाहिकेचीही व्यवस्था केली जाणार आहे. शासनाकडून या सर्व सेवा कंत्राटी पद्धतीने पूर्ण केल्या जाणार आहेत.
रुग्णांची संख्या वाढताना दिसताच ग्रामीण भागातील रुग्णांना गृहविलगीकरणात राहण्यास अडचणी निर्माण होत असल्याने इसापूर येथे खासदार रामदास तडस आणि महालक्ष्मी कंपनीच्या माध्यमातून १०० खाटांचे कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे.