वेश बदलला तरी 'फेस' ओळखणार; 'एआय' कॅमेरे वर्धेवर नजर ठेवणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2024 04:52 PM2024-10-07T16:52:27+5:302024-10-07T16:53:54+5:30
वर्धेवर आता स्मार्ट 'सीसीटीव्हीं'चा 'वॉच' : जुने कॅमेरेही करण्यात आले अपग्रेड
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : सराईत गुन्हेगारांच्या तसेच वाँटेड आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी वर्धा आणि हिंगणघाट शहरात आर्टिफिशिअल इंटेलिजन्स बेस (एआय) कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत. यातील एआय बेस फेस रेकग्नायझेशन यंत्रणेमुळे शहरात दाखल झालेल्या सराईत गुन्हेगारांची माहिती मिळविण्यात पोलिसांना आता मदत होणार आहे. वर्धा शहरात ९५ वर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून, वर्धेकरांवर आता तिसऱ्या डोळ्याचा 'वॉच' राहणार आहे.
शहरातील संशयास्पद घडामोडींवर नजर ठेवण्यासाठी वर्धा शहरात ९३ आणि हिंगणघाट शहरात जवळपास ६०, असे एकूण १५२ स्मार्ट सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत. इतकेच नव्हे तर सर्व जुने सीसीटीव्ही कॅमेरेदेखील अपग्रेड करण्यात आलेले आहेत. या माध्यमातून शहर, राज्यासह देशभरातील वाँटेड असलेल्या आरोपींना ओळखणे शक्य होणार आहे.
२०२० मध्ये पोलिस अधीक्षक कार्यालयातील कंट्रोल युनिटला आग लागून सर्व खाक झाले होते तेव्हापासून शहरातील तिसरा डोळा बंदच होता. तत्कालीन पोलिस अधीक्षक नूरूल हसन यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यासाठी पाठपुरावा केला होता. निधीही मंजूर झाला होता, आता सीसीटीव्ही बसविण्यात आलेले आहेत. शहरातील पोस्ट ऑफिस चौक, बसस्थानक चौक, रेल्वे स्थानक चौक, मुख्य मार्ग, शिवाजी महाराज चौक, इतवारा चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, सामान्य रुग्णालय परिसर चौक, सिव्हिल लाईन्स परिसर आदी विविध मुख्य ठिकाणी एआय बेस कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत. काळानुरूप गुन्हेगारीदेखील हायटेक झाल्याने पोलिसांपुढे आव्हान निर्माण होत आहे.
तर अनेकदा एका शहरात गुन्हा करून आरोपी दुसऱ्या शहरात वास्तव्य करतो. मात्र, असे गुन्हेगार शहरात आले, की त्यांचा थांगपत्ता लागत नाही. या सर्व पार्श्वभूमीवर आता वर्धा पोलिसांकडूनदेखील अत्याधुनिक यंत्रणेच्या माध्यमातून आरोपींना पकडण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले जाणार आहेत. याचाच एक भाग म्हणून आता फेस रेकग्नायझेशन यंत्रणा कार्यान्वित करण्यात आलेली आहे. गुन्हेगारांनी पेहराव बदलला तरी चेहऱ्याच्या ठेवणीवरून हे सराईत आरोपी कॅमेऱ्यात तत्काळ कैद होतील. त्यामुळे सराईत आरोपींची चलाखीही येथे काम करणार नसल्याचे पोलिस अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.
तत्काळ कारवाई करणे होणार शक्य
सीसीटीव्हीच्या माध्यमातून फेस रिकग्नायझेशन सिस्टीमचे काम चालणार आहे. सीसीटीव्हीत येणाऱ्या प्रत्येक नागरिकाचा चेहरा या यंत्रणेच्या माध्यमातून कॅप्चर' होईल. त्यानंतर पोलिसांकडे असणाऱ्या गुन्हेगारांच्या माहितीनुसार गुन्हेगार किंवा संशयित, यामध्ये आढळून आल्यास त्याची सूचना नियंत्रण कक्षाला मिळून संबंधित ठिकाणी तत्काळ कारवाई करणे शक्य होणार आहे.
गर्दीच्या ठिकाणी राहणार तिसऱ्या डोळ्याचा 'वॉच'
अनेकदा स्थानक परिसरात मोबाइल चोरी, पाकीटमारीच्या घटना घडतात. यासह प्रवासादरम्यान सोन्याच्या दागिन्यांचीही चोरी केली जाते. प्रमुख शहरांना गुन्हेगारांचा धोकादेखील असतो. गर्दीच्या ठिकाणी अशा हालचाली होतात. अशा ठिकाणांहून गुन्हेगारांना पळ काढणे सोपे असते. मात्र, या यंत्रणेची अंमलबजावणीमुळे हा धोका कमी होणार असून प्रत्येक चौकातील घडामोडींवर बारीक लक्ष राहणार आहे.