शीतदही होऊनही सोयाबीनचा पत्ता नाही
By admin | Published: October 13, 2014 11:26 PM2014-10-13T23:26:02+5:302014-10-13T23:26:02+5:30
यावर्षी कोरड्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांना दुबार तर कोणाला तिबार पेरणी करावी लागली या कारणाने बळीराजा पुरता बेजार झाला आहे. नेमक्या वेळी पावसाने दडी मारल्याने सोयाबीनचे उत्पादन
वायगाव (नि.) : यावर्षी कोरड्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांना दुबार तर कोणाला तिबार पेरणी करावी लागली या कारणाने बळीराजा पुरता बेजार झाला आहे. नेमक्या वेळी पावसाने दडी मारल्याने सोयाबीनचे उत्पादन एक महिना पुढे गेले. शीतदही आटोपून आता कापूस वेचायला सुरुवातही झाली आहे. पण अद्याप सोयाबीन हाते न आल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.
यंदा पावसाने चांगलाच दगा दिल्याने खरीप हंगाम हिरावला गेला आहे. कोरडवाहू शेतकऱ्यांच्या तर तोडचे पाणीच पळाले आहे. पण ओलिताची सोय असलेल्या शेतकऱ्यांची स्थितीही तितकीशी चांगली नाही. कारण सततच्या भारनियमनाने व्यवस्थित ओलितही त्यांना करता आलेले नाही.
दरवर्षी दिवाळी आधी सोयाबीन चे उत्पन्न हाती येते. ते विकून शेतकऱ्यांना कशीबशी दिवाळी साजरी करता येत होती. कुठेकुठे शीतदही होऊन कापूस वेचण्याची तयारीही सुरू झाली आहे. पण सोयाबीनची सवंगणी मात्र सुरू झाली नसल्याने दिवाळी कशी साजरी होणार असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
पाण्याअभावी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पाणी नसल्याने पऱ्हाटीही करपत चालली आहे. सोयाबीन ला शेंगा फार कमी प्रमाणात लागल्या आहे. तसेच पिकावर रोगाने मारा केला आहे. दुबार-तिबार पेरणी नंतरही पीक हाती येणार की नाही या विवंचनेत आहे. खरीप हंगामाकरिता बळीराजाने केलेल्या उसनवारीचा व कर्जाचा डोंगर वाढतच जात आहे. सोयाबीनचे दाण्याचा आकार ज्वारीच्या दाण्याएवढा आहे. त्यामुळे उत्पादन झाले तरी ते किती होणार याचाही विचार शेतकऱ्यांना त्रस्त करीत आहे. कापसाने तरी साथ देण्याची आशा शेतकरी व्यक्त करीत आहे.(वार्ताहर)