शाळेत नोकरी असतानाही अनेकांकडून शिकवणी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2017 10:49 PM2017-09-02T22:49:17+5:302017-09-02T22:50:02+5:30
जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये नोकरीवर असणारे शिक्षक आर्थिक फायद्यासाठी खासगी शिकवणी घेत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये नोकरीवर असणारे शिक्षक आर्थिक फायद्यासाठी खासगी शिकवणी घेत आहेत. या प्रकारामुळे सदर शिक्षक शाळेत गरजू व गरीब विद्यार्थ्यांवर पाहिजे तसे लक्ष देऊ शकत नसल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होते. हा प्रकार गंभीर असून अशा शिक्षकांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी वीर छावा संघटनेच्यावतीने करण्यात आले आहे. त्याबाबतचे निवेदनही शिक्षणाधिकाºयांना देण्यात आले आहे.
सध्या शासकीय सेवेतील शिक्षक स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी घरी व इतर ठिकाणी खासगी शिकवणी वर्ग घेत आहेत. या प्रकारामुळे गरीब व आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक असलेल्या विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याने अशा खासगी शिकवणी वर्गावर त्वरीत बंदी घालण्यात यावी. तसेच नियमांना डावलून खासगी शिकवणी वर्ग घेणाºयांवर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. मागणीचा विचार न झाल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे. सदर निवेदन उपशिक्षणाधिकारी एस. के. मेश्राम यांना सादर करण्यात आले. जि.प. उपशिक्षणाधिकारी मेश्राम यांना निवेदन देताना निलेश चौधरी, कुणाल लोणारे, स्वप्नील पट्टेवार, अमीत अखुज, प्रशांत कोटरंगे, कैलास विधाते, राहुल काळे यांच्यासह छावा संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मागणीचा विचार न झाल्यास आंदोलनाचा इशारा
संघटनेच्यावतीने करण्यात आलेल्या मागणीवर येत्या काही दिवसामध्ये जि.प.च्या शिक्षण विभागाने सहानुभूतीपूर्वक विचार न केल्यास जिल्ह्यात ठिकठिकाणी जि. प. शिक्षण विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदन स्वीकारताना अधिकाºयांशी सकारात्मक चर्चा झाली.