आजही समस्यांवर गांधी विचारातूनच जातोय समाधानाचा मार्ग

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2024 04:07 PM2024-10-02T16:07:08+5:302024-10-02T16:25:52+5:30

बापूंची १५५ वी जयंती: दहा वर्षे सेवाग्रामात राहिले वास्तव्य

Even today, problems are solved only through Gandhian thought | आजही समस्यांवर गांधी विचारातूनच जातोय समाधानाचा मार्ग

Even today, problems are solved only through Gandhian thought

दिलीप चव्हाण 
लोकमत न्यूज नेटवर्क 
सेवाग्राम :
सत्य, अहिंसा, शांती आणि सत्याग्रहाचे शस्त्र जगाला महात्मा गांधीजींनी दिले. त्यांचा कार्यकाळ वेगळा असला तरी आधुनिक काळातही गांधी प्रासंगिक असल्याचे दिसून येते. देशातच नव्हे, तर जगात ज्या समस्या निर्माण झाल्या त्यांच्या समाधानाचा मार्गसुद्धा त्यांच्याच विचारांतून जातो. म्हणूनच आजही गांधी विचाराशिवाय पर्याय नसल्याचे सातत्याने अभ्यासक आणि विचारवंत सांगतात. त्यांची २ ऑक्टोबरला १५५ वी जयंती असून, स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र राहिलेल्या आश्रमात अखंड सूत्रयज्ञ, सामूहिक प्रार्थना आणि विविध कार्यक्रमांतून आदरांजली वाहिली जाते. 


राष्ट्रपिता महात्मा गांधी हे अहिंसेचे उद्‌गाता म्हणून ओळखले जात असल्याने त्यांची जयंती 'जागतिक अहिंसा दिवस' म्हणून साजरी केली जाते. बापूंनी देशाला स्वातंत्र्य मिळावे यासाठी सत्याची कास धरली. अहिंसेने समस्येचे समाधान होते, शांतीने मार्ग निघतो आणि कुठलीही हिंसा न करता आपल्या ध्येयावर कायम राहून सत्याचा मार्ग पत्करणाऱ्या गांधीजींनी स्वातंत्र्य चळवळीत याचा पुरेपूर उपयोग करून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. यात देशवासीयांचा सहभागही उल्लेखनीय राहिला. गांधीजींच्या अहिंसक सत्याग्रहाचा प्रयोग अमेरिकेत काळ्या लोकांवरील अत्याचाराविरोधात मार्टिन ल्युथर किंग यांनी लढा उभारून यशस्वी केला, तर दक्षिण आफ्रिकेतील निग्रोसाठी नेल्सन मंडेला यांनीही हाच मार्ग निवडला. जगाच्या पाठीवर अनेक राष्ट्रे आहेत, ज्यांनी गांधीजींच्या अहिंसा आणि सत्याग्रहाच्या माध्यमातून लढा दिला आणि यशस्वी झाले. यावरून जगातील बलाढ्य राष्ट्रसुद्धा बापूंच्या विचारांचेच अनुसरन करतात आणि आजही हाच मार्ग सर्वांसाठी योग्य नी न्यायिक असल्याचे सिद्ध झाले आहे. म्हणून व्यक्ती नसले तरीही त्यांचे विचार हे अमर असल्याचे दिसून येत आहे. 


बापूंचे एकादश व्रत मार्गदर्शकच 
गांधीजीच्या विचारांची सुरुवात अंतिम व्यक्त्तीच्या गरजेपासून होते. त्यामुळे अर्थव्यवस्थेत त्यांनी यांचाच विचार अगोदर केला, उत्पादनवाढीत लोकांचा विचार व्हावा. रोजगार वाढला पाहिजे, अधिक नफा यावर भर नको आणि एकाच्या हातात मालकी हक्क नको असाही आग्रह होता, पर्यावरणाचा प्रश्न गंभीर झाल्याने त्यांचे परिणामही भोगावे लागत आहेत; पण या समस्येच्या निराकरणासाठी मानवांनी आपली जीवनशैली बदलली पाहिजे, असा आग्रह बापूंचा होता. औद्योगिक क्रांती दिलासा देणारी ठरली असली तरी यातूनच चंगळपणा, उपभोग आणि पुढे प्रदूषण वाढून समस्या वाढत गेली; पण गरजा काही संपत नाही, यासाठी कमीत कमी गरजा, पर्यावरण हास न करता संवर्धन, युज अॅड थ्रो प्रवृत्ती बदलावी लागण्याची सूचनाही एकादश व्रतांतून बापूंनी केल्या आहेत.


गांधीजींचे जीवन प्रेरणादायक 
बापूंचे जीवन हे इतरांसाठी प्रेरणादायी, दिशादर्शक आणि मार्गदर्शक नक्कीच आहे. बापूंच्या विचारांवर आस्था दाखविणारे अभ्यासक, कार्य करणाऱ्या संस्था आणि व्यक्ती असंख्य असल्याने 'गांधींना मरण नाहीच', अशीच त्यांची भावना आहे. सेवाग्राम येथील आश्रमाकडे लोकांचा कल वाढला असून, तो सकारात्मक संदेश देण्याचे काम करीत आहेत. नव्या पिढीने गांधीजींचा विचार मार्ग समजावून घेणे गरजेचे आहे. यासाठी गांधी संस्थांनी आणि ज्येष्ठांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. गांधी विचारच समाधानाचा मार्ग असल्याचे जनमानसातील चर्चेतून समोर येत असून, नव्या पिढीपर्यंत पोहोचण्याची गरज आहे.


शेती, गोशाळा आश्रमाचा पाया 
सेवाग्राम आश्रमात गांधीजींच्या कार्य आणि विचारांची माहिती लोकांना व्हावी यासाठी मार्गदर्शिका संगीता चव्हाण, अश्विनी बघेल, दीपाली उंबरकर सेवारत आहेत. कापसापासून कापड तयार करणे या कामातून आजही पर्यटकांना बापूंच्या कार्याची ओळख होत आहे. चरखा, अंबर चरखा, विणाई यंत्र आणि त्यामागील अर्थशास्त्र यांचे ज्ञान होते. शेती आणि गोशाळा हा आश्रमाचा पाया असून, याची ओळख आश्रमातील उपक्रमातून होत आहे.

Web Title: Even today, problems are solved only through Gandhian thought

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.