आजही घडविते स्त्री-शक्तीचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 12:49 AM2017-09-11T00:49:38+5:302017-09-11T00:49:53+5:30
धाम नदीच्या तिरावर भूदानाचे प्रणेते आणि सर्वोदयाचे पुरस्कर्ते विनोबा भावे यांचे परमधाम आश्रम आहे.
दिलीप चव्हाण।
लोकमत न्यूज नेटवर्क
सेवाग्राम : धाम नदीच्या तिरावर भूदानाचे प्रणेते आणि सर्वोदयाचे पुरस्कर्ते विनोबा भावे यांचे परमधाम आश्रम आहे. विनोबांनी या आश्रमातून आध्यात्म आणि विज्ञानाची सांगड घालून दोन्ही बाबी एकमेकांशी निगडीत असल्याचे दाखवून दिले होते. शिवाय सर्वत्र महिला सक्षमीकरणाचे वारे वाहत असताना विनोबांनी त्यांच्या कर्मभूमित भगिनींचा आश्रम निर्माण केला होता. त्या आश्रमातून आजही स्त्रीशक्तीचा लढा सुरू आहे.
विनोबा भावे भारतीय संस्कृतीमध्ये ऋषी परंपरेतील एक महान वैचारिक क्रांतीचे पथदर्शक होते. ते असामान्य प्रतिभेचे धनी, अध्यात्मिक परंपरा पूढे नेणारे असले तरी त्यांनी सर्वोदय व सर्वनाशाचा नवा विचार जगापुढे ठेवला. विश्वात मानवासाठीच नव्हे तर सृष्टीसाठी त्याचा विचारच तारणहार ठरणारा दिसतो. अशा थोर स्वातंत्र्य सेनानी व अध्यात्माची परंपरा जपणाºया आचार्य विनोबा भावे यांची सोमवारी (११ सप्टेंबर) १२२ वी जयंती आहे.
विनायक नरहरी भावे यांचा जन्म कोकणातील गागोद या गावी १८९५ मध्ये सामान्य कुटंूबात झाला. आईचा आध्यात्मिक, वडिलांकडून वैज्ञानिक संस्कार बालवयातच झाले. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, या म्हणीचा साक्षात्कार त्यांनी युवावस्थेत दिला. शिक्षणाच्या ओढीतून गृहत्याग करून त्यांनी बडोदा, मुंबई, काशी आदी ठिकाणी जाऊन अध्ययन केले. काशीमध्ये गांधीजींचे भाषण ऐकले. भाषणाने प्रभावित होऊन आपल्याला ध्येय लाभले या भावनेतून कोचर आश्रमात गांधीजींची भेट घेतली. बापूंनी विनायकचे विनोबा, असे नामकरण करून आश्रमातील दुर्लभरत्न अशा शब्दात त्यांचे वर्णन केले. गांधीजींच्या सूचनेप्रमाणे विनोबा वर्धा आश्रमात आले. पवनार त्यांची कर्मभूमी व प्रयोगभूमी बनली. रचनात्मक कार्यासोबत ग्रामसेवा व कठोर परिश्रम तसेच अध्ययनातून त्यांच्या वैचारिकतेचा, साहित्यिकतेचा परिचय नागरिकांना होऊ लागला. स्वातंत्र्य चळवळीत त्यांना तुरुंगवास घडला. तुरुंगात त्यांनी गीतेवर प्रवचन दिले. ते गीता प्रवचन या नावाने प्रसिद्ध झाले. येथूनच गिताईची रचना केली. १९४० मध्ये दुसºया विश्वयुद्धाच्या विरोधात पहिले सत्याग्रही म्हणून बापूंनी त्यांची निवड केली. त्यांनी स्वातंत्र्यासाठी अनेकदा सत्याग्रह व तुरूंगवास पत्करला होता.
भूदानातून ४२ लाख एकर जमीन संकलीत
विनोबांनी सब भूमी गोपाल की, हा नारा दिला. या नाºयाने देशात वेगळेच वातावरण निर्माण झाले. पदयात्रेतून ४२ लाख एकर जमीन भूदान चळवळीतून जमा झाली. जगाच्या इतिहासात नोंद ठेवावी, अशी त्यांची भूदान यात्रा ठरली. यातूनच सर्वोदयी समाजाची कल्पना प्रत्यक्षात साकारण्यात त्यांची महत्त्वावी भूमिका राहिली.
देशाला त्यांच्या सूङत्रांची गरज
विनोबांनी विज्ञान अधिक अध्यात्मक म्हणजे सर्वोदय आणि विज्ञान अधिक हिंसा म्हणजे सर्वनाश, हे दोन सुत्रे जगाला दिली. सर्वोदयातून जगाचे कल्याण तर सर्वनाशातून जगाचा नाश, ही मानव जातीसाठी त्यांची महत्त्वपूर्ण देण आहे. २१ व्या शतकातील जगातील परिस्थिती पाहता तिसरे युद्ध केव्हा होईल हे सांगता येत नाही. यामुळे त्यांचे विचार कल्याणकारी ठरत आहे.
ब्रह्मविद्या मंदिर हा भगिनींचा आश्रम असून या ठिकाणी ३० कार्यकर्ते कार्य करीत आहे. विनोबाजींनी भगिनींचा आश्रम बनवून स्त्री-शक्तीला जागृत करण्याचे काम केले आहे. महिलांनी सीमित न राहता आपल्या विचार व कार्याने समाज, राष्ट्र व विश्वशांतीसाठी काम करावे, आपली एक जीवनशैली निर्माण करून समाजात जागृतीचे काम व्हावे. आश्रम स्वावलंबी पद्धतीने आहे. या क्षमाधारीत जीवन पद्धतीचा अंगिकार केला असून त्या पद्धतीने कार्यकर्ते कार्यरत आहे. विनोबांच्या विचार व कार्यावर आश्रम आहे; पण आश्रमात शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, स्त्रिया, विनोबा मित्र मिलनासोबत राष्ट्रीय स्तरावर संगिताचा कार्यक्रम व शिबीर घेत बाबांचे तत्व व कार्य पोहोचविण्याचे कार्य होत आहे. पुस्तकांचे प्रकाशन होत असते. महाराष्ट्र सरकारने गोहत्या बंदीचा कायदा केला. तो केंद्रीय कायदा बनून देशातच गोवंश बंदी व्हावी, अशी अपेक्षा आहे.
- ज्योती दीदी, साधिका, पवनार आश्रम.