अखेर क्रेनच्या सहाय्याने विहिरीतून बाहेर काढला बाधित रूग्णाचा मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2021 01:36 PM2021-04-19T13:36:29+5:302021-04-19T13:37:39+5:30
Corona patient's deadbody : रूग्णालयातून केले होते पलायन : कोरोना योद्धांनी पार पाडला अंत्यविधी
आर्वी / देऊरवाडा (वर्धा) : आर्वी येथील उपजिल्हा रूग्णालयातून पलायन केलेल्या बाधित रूग्णाचा मृतदेह विहिरीत आढळून आला होता. त्या बाधित रुग्णाचा मृतदेह सोमवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास क्रेनच्या सहाय्याने विहिरीतून काढण्यात आला. दरम्यान कोरोना योद्धांनी मृतदेहावर मोक्षधामात अंत्यसंस्कार केले. दरम्यान पोलिसांची चांगलीच दमछाक झाली.
आर्वी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णाने पलायन केले होते. त्यानंतर त्याचा शोध घेतला असता विहिरीत आत्महत्या केल्याचे उघडकीस आल्याने शहरात एकच खळबळ उडाली होती. ही घटना रविवारी उघडकीस आली.
विजय उत्तम खोडे रा. बोरगाव टूमनि तालुका आष्टी असे या कोरणा बाधित मृतकाचे नावे आहे. १४ रोजी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आलाहोता.त्याला आष्टी वरून आर्वी उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले हाेते. त्याच्यावर उपचार सुरू होते. मोठ्या भावाने त्याची भेटही घेतली होती. मात्र, शनिवारी मध्यरात्रीनंतर विजय खोडे याने रूग्णालयातून पलायन केले होते. मृताच्या भावाने ओळख पटविली असता विहिरीतून मृतदेह काढण्यास तयारी करण्यात आली. पाण्याचा उपसा करणारी मोटर आणून विहिरीतील पाण्याचा उपसा सुरू केला होता. पण विहिरीला पाणीच पाणी असल्याने व कपारीत मृतदेह अडकला होता. सोमवारी क्रेनच्या साहायाने पलंग बांधून एकाला विहिरीत उतरवून मृतदेह काढण्यात आला.
यावेळी ठाणेदार संजय गायकवाड, फौजदार योगेश चहेल, अतुल भोयर, विजय तोडसाम, प्रकाश सानप, रंजीत जाधव, प्रदीप दाताळकर, पांडुरंग फुगणार, अतुल गोटफोडे आदींची उपस्थिती होती. विहिरीपासून रस्त्यापर्यंत मृतदेह चौघांनी खाटेवर टाकून रूग्णवाहिकेत टाकला.त्यानंतर विक्की टाक, विक्की रामटेके, धीरज हडले, पुरुषोत्तम या योद्धांनी मृतदेहावर मोक्षधामात अंत्यसंस्कार पार पाडले.