अखेर रोहणा बँक शाखा आर्वीला स्थानांतरित
By admin | Published: January 1, 2017 02:05 AM2017-01-01T02:05:41+5:302017-01-01T02:05:41+5:30
इमारत भाडे व प्रशासकीय खर्च वाचविण्याच्या नावाखाली जिल्हा मध्यवर्ती सहभागी बँकेच्या रोहणा शाखेचे स्थानांतरण आर्वी येथे करण्यात आले.
रोहणा : इमारत भाडे व प्रशासकीय खर्च वाचविण्याच्या नावाखाली जिल्हा मध्यवर्ती सहभागी बँकेच्या रोहणा शाखेचे स्थानांतरण आर्वी येथे करण्यात आले. सदर शाखा बंद झाल्याने ठेवीदार व खातेदारांना आर्वीला हेलपाटे मारावे लागणार आहे. कर्जधारक शेतकरी, व्यावसायिक व नोकरदार वर्गाला वसुलीपायी होणाऱ्या त्रासापासून थोडातरी दिलासा मिळणार आहे.
२०१२ पासून आर्थिक डबघाईचा सामना करीत असलेल्या वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने बरेच चढउतार अनुभवले. परवाना रिझर्व्ह बँकेकडून पुनर्जीवित केल्यानंतर बँकेच्या व्यवहारात सुधारणा होईल, अशी अपेक्षा असताना व खातेदारांची १० टक्के रक्कम परत करणे सुरू असताना बँक प्रशासानाने खर्च वाचविण्यासाठी ग्रामीण शाखा शहरी शाखेत स्थानांतरित करण्याचा निर्णय घेतला. परिणामी, ५० वर्षांची शेतकरी, शेतमजूर व गरिबांची बँक म्हणून नावारूपास आलेली येथील शाखा शनिवारपासून आर्वी शाखेत विलीन करण्यात आली. खातेदार व स्थानिक लोकप्रतिनिधींच्या विरोधावर मात करीत शाखेचे विलीनीकरण झाले. यामुळे रोहणासह परिसरातील १६ गावांतील लाखाच्या वर खातेदारांचे कोट्यवधी रुपये बँकेत अडकले. आता आर्वीला चकरा मारण्याची वेळ खातेदारांवर आली. ठेवीदारांचीही चिंता वाढली आहे.
एकंदरीत या स्थानांतरणामुळे रोहण्याच्या आर्थिक क्षेत्रात पोकळी निर्माण होणार असून सामान्यांच्या आर्थिक अडचणीत भर पडणार आहे.(वार्ताहर)