आयुष्यातील प्रत्येक संकटाला आव्हान म्हणून स्वीकारावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 09:55 PM2019-07-29T21:55:38+5:302019-07-29T21:55:57+5:30
गुणवंत, ज्ञानवंत, भाग्यवंत आणि कष्टकऱ्यांनी आपले ज्ञान, अपार कष्ट, मेहनत, चिकाटी व प्रामाणीकपणा या जोरावर जे यश प्राप्त केले असते ते समाजापुढे येणे महत्त्वाचे असते. त्यांच्या यशाचे कौतुक करून त्यांच्याकडून भावी आयुष्यात अधिक चांगले समाजोपयोगी व दिशादर्शक काम करण्याची प्रेरणा मिळेल.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : गुणवंत, ज्ञानवंत, भाग्यवंत आणि कष्टकऱ्यांनी आपले ज्ञान, अपार कष्ट, मेहनत, चिकाटी व प्रामाणीकपणा या जोरावर जे यश प्राप्त केले असते ते समाजापुढे येणे महत्त्वाचे असते. त्यांच्या यशाचे कौतुक करून त्यांच्याकडून भावी आयुष्यात अधिक चांगले समाजोपयोगी व दिशादर्शक काम करण्याची प्रेरणा मिळेल. तसेच आपल्या विद्यार्थी जिवनात अनेक संकटे येतात, या आयुष्यातील प्रत्येक संकटाचा आव्हान म्हणून स्वीकार करावा, असे प्रतिपादन खा. रामदास तडस यांनी केले.
महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा वर्धा जिल्हा व संताजी सेवा सांस्कृतिक मंडळ, कृष्णनगर वर्धा यांच्यावतीने आयोजित विशेष कार्यक्रमात ते मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. व्यासपीठावर माजी खासदार सुरेश वाघमारे, माजी आमदार राजू तिमांडे, माधव आनंद महाराज, शेखर शेंडे, सुधाकर सुरकार, रविकांत बालपांडे, प्रविण हिवरे, पंकज सायंकार, मिलिंद भेंडे, नरेंद्र मदनकर, निळकंठ पिसे, संतोष सेलूकर आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमादरम्यान खासदार रामदास तडस यांची तेली समाजाच्यावतीने लाडूतुला करण्यात आली. शिवाय जाहीर सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमादरम्यान दहावी आणि बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. तर पी.एच.डी. प्राप्त मान्यवरांनाही यावेळी सन्मानीत करण्यात आले. खा. तडस पुढे म्हणाले, दहावी व बारावी नंतर विद्यार्थ्यांनी आपल्या भविष्याचा विचार करून आपले ध्येय निश्चित करावे. योग्य शिक्षण प्रत्येकाच्या जीवनात महत्त्वाचे आहे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर जो ज्ञानासाठी करतो, तोच या युगात प्रगती करू शकतो. प्रत्येक विद्यार्थ्याने एक झाड लावून त्याचे संगोपन करावे, असेही यावेळी सांगितले. याप्रसंगी माजी खासदार सुरेश वाघमारे, माजी आमदार राजू तिमांडे, माधव आनंद महाराज, शेखर शेंडे, रविकांत बालपांडे, प्रविण हिवरे यांनीही मनोगत व्यक्त केले. संचालन वैद्य व हिवरे यानी केले. कार्यक्रमाला प्रशांत बुरले, सुनील शिंदे, शैलेंद्र झाडे, शोभा तडस, सचिन सुरकार, जगन्नाथ लाकडे, नितीन साटोणे, सुधीर चाफले, विनायक तेलरांधे, पुष्पा डायगव्हाणे, सुरेंद्र खोंड, हरिष हांडे, किशोर गुजरकर, अतुल पिसे, चंद्रकांत चामटकर, सतीश इखार, देवा निखाडे, विनोद इटनकर, मनीष तेलरांधे आदींनी सहकार्य केले.