प्रत्येक पात्र व्यक्तीने मतदार यादीत नाव नोंदविणे गरजेचे
By admin | Published: July 23, 2016 02:43 AM2016-07-23T02:43:21+5:302016-07-23T02:43:21+5:30
ज्या व्यक्तींनी १ जानेवारी २०१६ ला वयाची १८ वर्षे पूर्ण केलेली आहेत, अशा व्यक्तींनी मतदार यादीत नाव नोंदविणे गरजेचे आहे.
मतदान जनजागृती अभियान : मेघना वासनकर यांची पत्रपरिषदेत माहिती
पुलगाव : ज्या व्यक्तींनी १ जानेवारी २०१६ ला वयाची १८ वर्षे पूर्ण केलेली आहेत, अशा व्यक्तींनी मतदार यादीत नाव नोंदविणे गरजेचे आहे. पात्र व्यक्तींचे मतदार यादीत नाव नसेल त्यांनी ३१ आॅगस्ट २०१६ पर्यंत अर्ज करावे, नगर परिषदेची सार्वजनिक निवडणूक २०१६ मध्ये आहे. त्यामुळे प्रत्येक पात्र व्यक्तीने मतदार यादीत नाव नोंदवून मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन नगर परिषदेच्या मुख्याधिकारी डॉ. मेघना वासनकर यांनी पालिकेद्वारे आयोजित पत्रकार परिषदेत केले.
पालिकेच्या आगामी निवडणुकीत पात्र मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा या दृष्टीने नगर परिषदेद्वारे मतदान जनजागरण मोहीम राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी पत्रकार परिषदेत घेण्यात आली होती. मतदार यादीत नाव नसेल तर मतदान करता येणार नाही. नागरिकांनी मतदार म्हणून नव्याने नाव नोंदविण्यासाठी नमुना क्रं. ६ मतदार यादीतून काही कारणास्तव आपले नाव वगळण्यात आले असल्यास नमुना क्रं.६ नव्याने भरावा. नमुना क्रं.७ मध्ये मतदार यादीतील नोंदीच्या ओळखपत्रातील नोंदीच्या तपशीलामध्ये दुरूस्ती करावयाची असल्यास व मतदार यादीतील नोंदीचे त्याच मतदार संघात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थानांतर करावयाचे असल्यास नमुना क्र. ८ अ मध्ये अर्ज भरून संबंधित तहसील कार्यालय किंवा संबंधीत केंद्रस्तरीय अधिकारी यांचेकडे सादर करणे गरजेचे आहे.
१९ वर्षांच्या वरील मतदार मतदानापासून वंचित राहू नये म्हणून ही जनजागृती मोहीम राबविली जात असल्याचे पत्रकार परिषदेत मुख्याधिकारी मेघना वासनकर यांनी सांगितले. संचालन सुभाष श्रीपतवार यांनी केले.(तालुका प्रतिनिधी)