जंतनाशक गोळीचे सेवन सर्वांनी करणे आवश्यक
By admin | Published: September 8, 2016 12:44 AM2016-09-08T00:44:02+5:302016-09-08T00:44:02+5:30
मातीत पसरलेल्या कृमीमुळे मुलांमध्ये जंतसंसर्ग होऊन त्याचा परिणाम कुपोषण, अभ्यासात लक्ष न घालणे असा होतो.
वसंत आंबटकर : जंतनाशक मोहिमेचा जिल्ह्यात शुभारंभ
वर्धा : मातीत पसरलेल्या कृमीमुळे मुलांमध्ये जंतसंसर्ग होऊन त्याचा परिणाम कुपोषण, अभ्यासात लक्ष न घालणे असा होतो. त्यामुळे मुले अभ्यास व पर्यायाने जीवनात मागे पडतात. याकरिता सर्व विद्यार्थ्यांनी आरोग्य विभागामार्फत राबविलेल्या जंतनाशक मोहिमेस दिल्या जाणाऱ्या अॅलबेंडेझॉल (जंतनाशक गोळ्या) सेवन करून या मोहिमेस सहकार्य करावे, असे आवाहन आरोग्य व शिक्षण समितीचे सभापती वसंतराव आंबटकर यांनी केले.
केसरीमल कन्या शाळा येथे आयोजित राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहिमेच्या जिल्हास्तरीय शुभारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. या राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहिमेचा शुभारंभ कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरूषोत्तम मडावी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दुर्योधन चव्हाण, शिक्षणाधिकारी एल.एम. डुरे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले, प्राचार्य इंगोले, जिल्हा माताबाल संगोपन अधिकारी डॉ. राज गहलोत, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा सावळे, सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) डॉ. लक्षदीप पारेकर, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. प्रवीण धाकटे, डॉ. मंगेश रेवतकर, डॉ. विपीन झलके यांची उपस्थिती होते.
जंतसंसर्ग प्रामुख्याने अस्वच्छ हातामुळे होतो. त्यामुळे योग्य प्रकारे हात स्वच्छ धुण्याचे महत्व सर्व विद्यार्र्थ्यांनी अंगिकारणे आवश्यक आहे. राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेमध्ये जिल्ह्यात १ ते १९ वयोगटातील जंतनाशक गोळीचे सेवन करण्याची गरज डॉ. चव्हाण यांनी प्रास्ताविकातून विषद केली.
यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मडावी व शिक्षणाधिकारी डुरे यांनी समायोचित मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन जिल्हा माध्यम अधिकारी दिलीप रहाटे यांनी केले तर आभार प्राचार्य इंगोले यांनी मानले. शाळेतील मुलांना मान्यवरांच्या हस्ते अॅल्बेंडेझॉल गोळ्या खाऊ घालून या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता भगत, कल्पना टोणे, विजय जांगडे, बाबाराव कनेर, सोज्ज्वळ उघडे , जवादे यांच्यासह कर्मचारी व पदाधिकारी यांनी सहकार्य केले.(शहर प्रतिनिधी)