Corona Virus in Wardha; वर्ध्याच्या माजी जि.प.सदस्यासह तिघांची कारागृहात रवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2020 03:12 PM2020-03-26T15:12:41+5:302020-03-26T15:14:55+5:30
कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात संचारबंदी लागू असताना संचारबंदीचे उल्लंघन करून तहसीलदारांशी हुज्जत घालणे महागात पडले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात संचारबंदी लागू असताना संचारबंदीचे उल्लंघन करून तहसीलदारांशी हुज्जत घालणे महागात पडले. याप्रकरणी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अमित विजयसिंग ठाकूर, घनश्याम अहेरी आणि स्वप्नील लाड या तिघांना तुरुंगाची हवा खावी लागत आहे.
प्राप्त माहितीनुसार, कोरोना विषाणू आजाराला प्रतिबंध घालण्यासाठी तसेच त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात मंगळवारपासून संचारबंदी लागू करण्यात आली. त्या अनुषंगाने तहसीलदार प्रीती डुडुलकर या आपल्या चमूसह गस्तीवर नागरिकांना घराबाहेर न निघण्याच्या सूचना देत असताना त्यांना तुकाराम मठ परिसरात अमित विजयसिंग ठाकूर, घनश्याम अहेरी आणि स्वप्नील लाड हे अनावश्यक जमाव करून परिसरात बसून असल्याचे दिसून आले. दरम्यान, तहसीलदार प्रीती डुडुलकर यांनी गप्पा करीत बसलेल्या सर्वांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना देत घरात जाण्यास सांगितले असता अमित ठाकूर आणि त्यांच्या मित्रांनी तहसीलदारांशी हुज्जत घातली. तसेच शिवीगाळ करीत शिपाई सुनील मेंढे यांच्याशी वाद करीत त्यांना धक्काबुक्की केली. तहसीलदार या कर्तव्याचे पालन करीत असताना शासकीय कामात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी तहसीलदार प्रीती डुडुलकर यांनी रामनगर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली. तक्रारीवरून तिघांनाही अटक करण्यात आली. बुधवारी तिघांनाही न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची कारागृहात रवानगी केली.