गवतात बसून दिली विद्यार्थ्यांनी परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 10:26 PM2018-09-28T22:26:18+5:302018-09-28T22:26:46+5:30
विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावी या उद्देशाला केंद्रस्थानी ठेवून शासनाच्यावतीने रेखाकला परीक्षा घेतली जाते. या परीक्षेसाठी जिल्ह्यात पाच परीक्षा केंद्र देण्यात आले आहे. परंतु, वर्धा, सेलू व देवळी तालुक्यासाठी परीक्षा केंद्र म्हणून देण्यात आलेल्या वर्धा शहरातील महात्मा गांधी विद्यालयात शुक्रवारी परीक्षा केंद्र प्रमुखाच्या चालढकल धोरणामुळे विद्यार्थ्यांना चक्क गवतात बसून परीक्षा द्यावी लागली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावी या उद्देशाला केंद्रस्थानी ठेवून शासनाच्यावतीने रेखाकला परीक्षा घेतली जाते. या परीक्षेसाठी जिल्ह्यात पाच परीक्षा केंद्र देण्यात आले आहे. परंतु, वर्धा, सेलू व देवळी तालुक्यासाठी परीक्षा केंद्र म्हणून देण्यात आलेल्या वर्धा शहरातील महात्मा गांधी विद्यालयात शुक्रवारी परीक्षा केंद्र प्रमुखाच्या चालढकल धोरणामुळे विद्यार्थ्यांना चक्क गवतात बसून परीक्षा द्यावी लागली आहे.
शहरातील बस स्थानक शेजारी असलेल्या महात्मा गांधी या विद्यालयात शिक्षक डी. बी. नाखले हे पूर्वी कार्यरत होते. त्यांना या शाळेच्या परिस्थितीची जाण असल्याने त्यांच्या खांद्यावर परीक्षा केंद्राची परीक्षा केंद्र प्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली. परीक्षा देण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा देताना कुठल्याही गैरसोईला सामोरे जावे लागू नये याची जबादारीही केंद्र प्रमुखाचीच. परंतु, शुक्रवारी विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी या विद्यालयात आल्यावर नाखले यांनी सुमारे दीड फुट उंच वाढलेल्या गवतात सतरंजी टाकून त्यावर विद्यार्थ्यांना बसवून परीक्षा घेण्याचा सोपस्कार पूर्ण केला.
इतकेच नव्हे तर शाळेच्या वऱ्हांड्यात काही ठिकाणी सतरंजीवर आणि काही ठिकाणी सतरंजी विना जमिनीवर बसून विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. परीक्षा देताना काही विद्यार्थ्यांच्या पदरी वर्ग खोलीतील डेक्स-बेंच तर काहींच्या पदरी सतरंजी आली. या परीक्षा केंद्राची दैना बघून विद्यार्थ्यांसोबत आलेले पालक सदर परीक्षा केंद्र विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यासाठी की त्यांची प्रकृती बिघडविण्यासाठी अशी चर्चा करीत होते. या प्रकाराची चौकशी करून दोषींवर कठोर कार्यवाही करण्याची मागणी आहे.
शिक्षणाधिकाऱ्यांच्या सूचनेला बगल?
महात्मा गांधी विद्यालयात शासनाची रेखाकला परीक्षा घेताना होणारा खर्च म्हणून २० हजार ९० रुपयांचा निधी संबंधितांकडून मंजूर होत तो महात्मा गांधी विद्यालयातील लिपीक सिद्धार्थ पाझारे यांच्याकडे वळता करण्यात आला. तो निधी मिळावा म्हणून डी. बी. नाखले यांनी पाझारे यांना शिक्षणाधिकाऱ्यांच्या सूचनांचे पत्र दाखविले. परंतु, ही रक्कम शिक्षणाधिकाऱ्यांच्या सूचनेकडे पाठ दाखवून नाखले यांना देण्यात आली नाही.
माझ्याकडे परीक्षा केंद्राची केंद्र प्रमुख म्हणून जबाबदारी असली तरी शिक्षणाधिकाऱ्यांच्या लेखी सुचनांचे पत्र दाखवूनही पाझारे यांनी परीक्षा खर्चाचा निधी आपल्याला दिला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना सतरंजीवर बसण्याची वेळ आली.
- डी. बी. नाखले, परीक्षा केंद्र प्रमुख.
महात्मा गांधी विद्यालयाचा आपल्याकडे पूर्ण वर्ग शिक्षक म्हणून चार्ज आहे. नाखले यांनी आपल्याला कुठलेही शिक्षणाधिकाऱ्यांचे लेखी पत्र दिलेले नाही.
- सिद्धार्थ पाझारे, लिपीक, महात्मा गांधी विद्यालय, वर्धा.