उत्कृष्ट पोलीस अधिकारी, कर्मचारी सन्मानित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 12:23 AM2019-01-16T00:23:07+5:302019-01-16T00:23:56+5:30
पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी तपासात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना सन्मानित केले. पोलीस स्टेशन वर्धा शहर येथे भादंविच्या कलम ३९४, ३४१, ५०४, ५०६, ३४ तसेच भारतीय हत्यार कायद्याच्या...
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी तपासात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना सन्मानित केले.
पोलीस स्टेशन वर्धा शहर येथे भादंविच्या कलम ३९४, ३४१, ५०४, ५०६, ३४ तसेच भारतीय हत्यार कायद्याच्या कलम ३, २५ मध्ये वर्धा शहरातील सराईत गुन्हेगार राकेश मुन्ना पांडे (२७) व इम्रान उर्फ ईम्मू शेख जमील (२८) दोन्ही रा. इतवारा वर्धा यांना अटक करण्यात आली. या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या आरोपींना अटक करून त्यांच्याकडून एक पिस्टल व दोन जीवंत काडतूर जप्त केल्या प्रकरणी तसेच तर हत्यार कायद्यान्वये वर्धा शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात प्रवीण उर्फ डोंगा अशोक शेंडे (३०) रा. नागसेननगर याच्याकडून पिस्टल व दोन जीवंत काडतूस जप्त केल्या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक निलेश ब्राह्मणे व त्यांचे सहकारी पोलीस उपनिरीक्षक पंकज पवार, अशोक साबळे, नामदेव किटे, निरंजन वरभे, राजेद्र ठाकूर, नरेंद्र डहाके, दिनेश कांबळे, हरिदास काकड, रितेश शर्मा, वैभव कट्टोजवार, रामकृष्ण इंगळे, अमीत शुक्ला, सचिन खैरकार, राकेश आष्टनकर, संघसेन कांबळे, विकास अवचट यांना पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित केले.
वर्धा शहरात मागील काळात वाढत्या घरफाड्याचे गुन्ह्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखा तर्फे पाठपुरावा करण्यात आला. त्यामध्ये ३ जानेवारीला आरोपी संजय मधुकर मून (५०) रा. बेला ता. उमरेड, जि. नागपूर याला अटक करून त्यांच्याकडून एकूण १३ गुन्हे उघडकीस आणल्या प्रकरणी पोलीस निरीक्षक निलेश ब्राह्मणे, पोलीस उपनिरीक्षक पंकज पवार, उदयसिंग बारवाल, परवेज खान, दिवाकर परिमल, अमर लाखे, आनंद भस्मे यांचा यावेळी प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. तर पोलीस स्टेशन समुद्रपूर येथे कलम ३७९, ४११, ३४ अन्वये दाखल गुन्ह्याचा तपास करून आरोपीस शिताफीने अटक करून पोलीस स्टेशन समुद्रपूर येथील मोटार सायकल चोरीचे पाच गुन्हे व इतर पालीस स्टेशन मधील १६ गुन्हे उघडकीस आणल्या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण मुंडे, अरविंद येनूरकर, रवी पुरोहित, अक्षय राऊत, आशिष गेडाम, वैभव चरडे यांनाही पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.