सेलू, देवळी अन् आर्वी तालुक्यांत अतिवृष्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 05:00 AM2021-09-08T05:00:00+5:302021-09-08T05:00:02+5:30
मागील २४ तासांत वर्धा तालुक्यात ४६.६० मिमी, सेलू तालुक्यात ७६.४० मिमी, देवळी तालुक्यात ६९.५० मिमी, हिंगणघाट तालुक्यात ४०.५० मिमी, समुद्रपूर तालुक्यात ३३.५४ मिमी, आर्वी तालुक्यात ८३.२५ मिमी, आष्टी तालुक्यात ३९.०० मिमी तर कारंजा (घा.) तालुक्यात ५०.८५ मिमी पावसाची नोंद घेण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : मागील काही दिवस दडी मारलेल्या पावसाने बैल पोळ्याच्या दिवशी थांबून थांबून जिल्ह्यातील आठही तालुक्यांत दमदार हजेरी लावली. यामुळे नदी व नाल्यांच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे. मागील २४ तासांत जिल्ह्यात ४३९.६४ मिमी पावसाची नोंद घेण्यात आली असून सेलू, देवळी तसेच आर्वी तालुक्यात अतिवृष्टी झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. मागील २४ तासांत वर्धा तालुक्यात ४६.६० मिमी, सेलू तालुक्यात ७६.४० मिमी, देवळी तालुक्यात ६९.५० मिमी, हिंगणघाट तालुक्यात ४०.५० मिमी, समुद्रपूर तालुक्यात ३३.५४ मिमी, आर्वी तालुक्यात ८३.२५ मिमी, आष्टी तालुक्यात ३९.०० मिमी तर कारंजा (घा.) तालुक्यात ५०.८५ मिमी पावसाची नोंद घेण्यात आली आहे.
संत्रासह कपाशीला बसला फटका
कारंजा (घा.) : मुसळधार पावसाचा उभ्या संत्रा पिकाला तसेच कपाशी पिकाला चांगलाच फटका बसला आहे. तालुक्याचा विचार केल्यास सावरडोह, बेलगाव, सुसुंद्रा, खापरी या भागातील कपाशी पिकाला मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. उभ्या सोयाबीन पिकाची पावसामुळे नासाडी झाली आहे. या भागातील नुकसानीची पाहणी करून शासकीय मदतीची मागणी होत आहे.
नदी-नाले फुल्ल
रोहणा : मुसळधार पावसामुळे परिसरातील नदी व नाल्यांच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे. या परिसरातील कपाशी पिकाची पावसामुळे पातीगळ झाली असून, उभ्या सोयाबीन पिकाला फटका बसला आहे.
पवनारची धाम नदी फुगली
पवनार : संततधार पावसामुळे येथील धाम नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली असून, सध्या धाम नदी दुथडी भरून वाहात आहे. धाम नदी दुथडी भरून वाहात असल्याने नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असला तरी पाण्याने भरलेल्या नदीचे सौंदर्य बघण्यासाठी नागरिक एकच गर्दी करीत आहेत.
शेताला आले तळ्याचे स्वरूप
- विरुळ (आकाजी) : विरुळ आकाजी परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने तसेच शेतामध्ये पावसाचे पाणी साचल्याने अनेक शेतांना तळ्याचे स्वरूप आले आहे. शेतात साचलेेले पावसाचे पाणी शेताबाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले जात असून, जास्त पाण्यामुळे उभ्या पिकांवर विपरित परिणाम होत आहे. शिवाय शेतकऱ्यांची अडचण वाढली आहे.
तीन तालुक्यांत अपेक्षित पेक्षा जास्तच बरसला
मागील २४ तासांत जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली. सेलू तालुक्यात अपेक्षित पेक्षा ११.४० मिमी, देवळी तालुक्यात अपेक्षित पेक्षा ४.५० मिमी तर आर्वी तालुक्यात अपेक्षित पेक्षा तब्बल १८.२५ मिमी जादा पाऊस पडला असून तशी नोंद प्रशासनाने घेतली आहे.
कपाशीसह सोयाबीन पिकावर परिणाम
नंदोरी : मुसळधार पावसामुळे उभ्या सोयाबीन तसेच कपाशी पिकाला फटका बसला आहे. यामुळे या भागातील शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. महसूल विभागाने पाहणी करून नुकसानग्रस्तांना शासकीय मदत देण्याची मागणी होत आहे.