ना रांगा, ना नागरिकांची गर्दी; तरी बँकांत ‘फस्ट डे' १० कोटी
By महेश सायखेडे | Published: May 23, 2023 06:16 PM2023-05-23T18:16:18+5:302023-05-23T18:18:04+5:30
खात्यात जमा करण्यासाठी नो लिमिट : बदलून घेण्यासाठी २० हजारांची मर्यादा
वर्धा : केंद्रातील मोदी सरकारने दोन हजार रुपयांचे चलन असलेली नोट व्यवहारातून बाद करण्याचे जाहीर केले आहे. हा निर्णय जाहीर करताना संबंधित नोटा बदलून घेण्यासाठी चार महिन्यांचा अवधी दिला आहे. मंगळवारपासून दाेन हजारांच्या नोटा बदलण्याची प्रक्रिया सुरू झाली असून आज वर्धा जिल्ह्यातील विविध बँकांत सुमारे १० कोटींचे मूल्य असलेल्या दोन हजारांच्या नोटा जमा झाल्याचे सांगण्यात आले. विशेष म्हणजे दोन हजारांच्या नोटा बदलून घेण्यासाठी तसेच त्या बँक खात्यात जमा करून घेण्यासाठी मंगळवारी कुठल्याही बँकेच्या शाखेसमोर नागरिकांच्या तोबा गर्दी होत रांगा लागल्या नव्हत्या. दोन हजारांच्या नोटा बँक खात्यात जमा करण्यासाठी कुठलीही लिमिट नाही. पण संबंधित नोटा बदलून घेण्यासाठी २० हजारांची मर्यादा असल्याचे सांगण्यात आले, हे विशेष.
दोन हजारांच्या नोटांचा दोन वर्षांपासून पुरवठा नाहीच
केंद्रातील मोदी सरकारने पाचशे आणि एक हजाराच्या जुन्या नोटा व्यवहारातून बंद केल्यावर जुन्या नोटा बँकेत जमा करण्यासाठी शहरी आणि ग्रामीण भागातील प्रत्येक बँकेसमोर नागरिकांची तोबा गर्दी होत लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तर नंतर केंद्र सरकारने दोन हजारांच्या नोटा आर्थिक व्यवहारासाठी बहाल केल्या. पण याच दाेन हजारांच्या नोटांचा मागील दोन वर्षांपासून आरबीआयकडून वर्धा जिल्ह्याला पुरवठा झालेला नसल्याचे खात्रीदायक सूत्रांनी सांगितले.
एसबीआयच्या ट्रेझरी शाखेत आल्या ४९ नोटा
मंगळवारी दोन हजारांच्या नोटा बदलण्याच्या पहिल्या दिवशी दुपारी १२.३० वाजेपर्यंत सुमारे पाच नागरिकांनी दोन हजारांच्या एकूण ४९ नोटा बँकत जमा करून दुसऱ्या नोटा घेतल्याचे लोकमतच्या प्रतिनिधीशी बोलताना बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.