जन्मठेप की फाशी ? आज होणार शिक्कामोर्तब!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2022 05:00 AM2022-02-10T05:00:00+5:302022-02-10T05:00:23+5:30
आरोपी विकेश ऊर्फ विक्की नगराळे याने ३ फेब्रुवारी २०२० राेजी नंदोरी चौकात महाविद्यालयाच्या दिशेने जात असलेल्या पीडित प्राध्यापिकेच्या अंगावर अति ज्वलनशील पदार्थ असलेले पेट्रोल टाकून तिला आगीच्या हवाली करीत तिची क्रूरपणे हत्या केली. याच प्रकरणात बुधवारी हिंगणघाट येथील जिल्हा व अतिरिक्त सत्रन्यायालयाने आरोपीला दोषी ठरविले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : येथील नंदोरी चौकात दोन वर्षांपूर्वी घडलेल्या हिंगणघाट प्राध्यापिका जळीत प्रकरणाच्या स्मृतींना आजही उजाळा मिळाल्यावर, प्रत्येक नागरिकाच्या अंगावर शहारे उभे होतात. या प्रकरणातील आरोपी विकेश ऊर्फ विक्की नगराळे याने ३ फेब्रुवारी २०२० राेजी नंदोरी चौकात महाविद्यालयाच्या दिशेने जात असलेल्या पीडित प्राध्यापिकेच्या अंगावर अति ज्वलनशील पदार्थ असलेले पेट्रोल टाकून तिला आगीच्या हवाली करीत तिची क्रूरपणे हत्या केली. याच प्रकरणात बुधवारी हिंगणघाट येथील जिल्हा व अतिरिक्त सत्रन्यायालयाने आरोपीला दोषी ठरविले आहे. पण या प्रकरणातील आरोपीला फाशी की जन्मठेप, याबाबतचा निकाल दोन्ही बाजूचे शिक्षेबाबतचे मत जाणून घेतल्यावर जिल्हा व अतिरिक्त सत्रन्यायाधीश आर. बी. भागवत गुरुवारी जाहीर करणार आहेत. विशेष म्हणजे संपूर्ण राज्यात बहुचर्चित ठरलेल्या हिंगणघाट येथील जळीत प्रकरणाच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
असा होता घटनाक्रम...
- हिंगणघाट येथील नंदोरी चौकात ३ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी पीडित प्राध्यापिका ही बसमधून उतरली.
- पीडिता नंदोरी चौकात येण्यापूर्वी आरोपी विकेश नगराळे याने दुचाकीने हिंगणघाट येथील नंदोरी चौक परिसर गाठला होता.
- बसमधून उतरलेली पीडिता नेहमीप्रमाणे तिच्या महाविद्यालयात काही विद्यार्थिनींसह पायदळ जात असतानाच आरोपी विकेश ऊर्फ विक्की नगराळे याने त्याच्या हातातील बाटलीतील पेट्रोल पीडितेच्या अंगावर फेकत तिला आगीच्या हवाली केले.
- भर चौकात तरुणी जळत असल्याने नंदोरी चौक परिसरात एकच खळबळ उडून परिसरातील नागरिकांची तारांबळ उडाली. याचाच फायदा घेत आरोपीने घटनास्थळावरून यशस्वी पळ काढला.
- या घटनेत जखमी झालेल्या प्राध्यापिकेला परिसरातील नागरिकांच्या मदतीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
- जखमी प्राध्यापिकेची प्रकृती गंभीर असल्याने तिला नागपूर येथील रुग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले. तेथे उपचारादरम्यान सोमवार १० फेब्रुवारी २०२० रोजी पीडितेची प्राणज्योत मालवली.
- दरम्यान, हिंगणघाट पोलिसांनीही आपल्या तपासाला गती देत आरोपी विकेश नगराळे याला नागपूर पोलिसांच्या मदतीने बुटीबोरी येथून ताब्यात घेत अटक केली.
- विशेष म्हणजे हिंगणघाट येथील जळीत प्रकरणाचे संपूर्ण राज्यात पडसाद उमटत असताना, खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ५ फेब्रुवारी २०२० रोजी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन महिला अत्याचार प्रकरणाच्या तपासात हयगय केल्यास पोलिसांवरही कारवाई करण्याचे निर्देश दिले होते.
- तर आता गुरुवारी हिंगणघाट जळीत प्रकरणातील आरोपी विकेश नगराळे याला जिल्हा व अतिरिक्त सत्रन्यायालयाकडून शिक्षा ठोठावली जाणार आहे.
पोलिसांनी दिला खडा पहारा
हिंगणघाट जळीत प्रकरणाचा निकाल जाहीर होणार असल्याने निकालादरम्यान तसेच निकालानंतर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून हिंगणघाट येथील जिल्हा व अतिरिक्त सत्रन्यायालय भागातील सुमारे १५० मीटरचा परिसर पोलिसांकडून तात्पुरता सील करण्यात आला होता. येथे खुद्द पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांच्यासह १३ अधिकारी, ९८ कर्मचारी आणि दंगल नियंत्रण पथकाच्या कर्मचाऱ्यांनी खडा पहाराच दिला.