धाम स्वच्छतेच्या कामाचा मुहूर्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 10:25 PM2018-02-03T22:25:32+5:302018-02-03T22:26:14+5:30
जिल्ह्यातील महत्त्वाची माणली जाणारी धाम नदी जलपर्णीमुळे धोक्यात आली होती. शिवाय यात मोठ्या प्रमाणात घाण साचली. या घाणीच्या आणि जलपर्णीच्या विळख्यातून धाम नदी स्वच्छ करण्याकरिता नाम फाऊंडेशन आणि जिल्हा प्रशासनाच्यावतीने मोहीम सुरू करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा/आकोली : जिल्ह्यातील महत्त्वाची माणली जाणारी धाम नदी जलपर्णीमुळे धोक्यात आली होती. शिवाय यात मोठ्या प्रमाणात घाण साचली. या घाणीच्या आणि जलपर्णीच्या विळख्यातून धाम नदी स्वच्छ करण्याकरिता नाम फाऊंडेशन आणि जिल्हा प्रशासनाच्यावतीने मोहीम सुरू करण्यात आली. या मोहिमेचा शनिवारी काचनूर येथे शुभारंभ करण्यात आला.
यावेळी खा. रामदास तडस, आ. अमर काळे, माजी आमदार दादाराव केचे, जि.प. अध्यक्ष नितीन मडावी, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी नयना गुंडे, जि.प. उपाध्यक्ष कांचन नांदुरकर, अतिरिक्त मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. करुणा जुईकर, शिक्षण व आरोग्य सभापती जयश्री गफाट, सोनाली कलोडे, नाम फाऊंडेशनचे हरिष इथापे, जिल्हा परिषद सदस्य राजश्री राठी, पं.स. सदस्य नितीन अरबट, काचनूरच्या सरपंच नम्रता आंभोरे, राजू राठी, सुनील गफाट आदींची उपस्थिती होती.
धामकुंड येथून उगम पावलेल्या धाम नदी तिरावर ढगा भूवन, महाकाळी, सेवा, महादेवबाबा मंदिर, सुकळी (बाई), विनोबा भावे आश्रम इत्यादी पावन स्थळे आहेत. कारंजा, आर्वी, सेलू, वर्धा व हिंगणघाट तालुक्यातून वाहणारी धामनदी पशु-पक्ष्यांसह व लोकांची तृष्णातृप्ती करणारी वरदायिनी आहे. मात्र गत काही वर्षांपासून धामनदीचे पात्र जलपर्णीमुळे अरूंद झाले आहे. पाणी सुद्धा प्रदूषित झाले आहे. त्यामुळे शासन, जि.प. व नाम फाऊंडेशन व सामाजिक सहभागातून नदीचे पात्र स्वच्छ करण्याचा मुहूर्त झाला. जि.प. सदस्य राजश्री राठी व सरपंच नम्रता आंभोरे यांनी जेसीबी मशिनचे पूजन करून अभियानाला सुरुवात केली. यावेळी पंचक्रोशीतील शेकडो नागरिक उपस्थित होते.
तत्पुर्वी येथील जि.प. शाळेत सभेचे आयोजन करण्यात आले होते. कोणतेही सामाजिक काम लोकसहभाग असल्याशिवाय होणे शक्य नाही. त्याकरिता नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले. खा. रामदास तडस म्हणाले की, नदीपात्र स्वच्छ करण्याची जबाबदारी ही सर्वांची असून तन, मन, धनाने या कार्यात जनतेने मदत करावी तरच कार्य तडीस जाईल. सामाजिक कार्यासाठी राजकारण, मतभेद बाजुला ठेवून काम केले तर कोणतेच काम कठीण नाही, असे आ. अमर काळे म्हणाले.
आमदार काळे यांनी चिमटे घेत मार्मिक टोलेबाजी करीत सभा जिंकली. त्यांच्या प्रत्येक वाक्यावर टाळ्यांचा कडकडाट होत होता. कार्यक्रमाचे संचालन पं.स. सदस्य नितीन अरबट यांनी केले. यावेळी नागरिकांची उपस्थिती होती.
दूषित पाण्याला नदीत प्रतिबंध
जिल्हाधिकाऱ्यांची माहिती
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : धाम नदीच्या स्वच्छतेच्या कामाचा मुहूर्त झाला. जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, नाम फाऊंडेशन आणि लोकसहभागातून हे काम करण्यात येणार आहे; पण या नदीकाठावर असलेल्या गावातील सांडपाणी या नदीत येत असल्याने पाणी प्रदूषित होत आहे. गावातील दूषित पाणी नदीत येणार नाही याकरिता गावागावांत शोषखड्डे निर्माण करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी शैलश नवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्ह्यात धाम नदीच्या स्वच्छतेचा उपक्रम पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविण्यात येत आहे. या उपक्रमात नागरिकांचा सहभाग पाहून इतर नदींच्या स्वच्छतेचा उपक्रम हाती घेतला जाईल. जिल्ह्यात असे एकूण चार प्रोजेक्ट राबविण्यात येत आहे. धाम नदी स्वच्छतेच्या प्रकल्पात दर शनिवारी आणि रविवारी श्रमदान करण्यात येणार आहे. या श्रमदानातून नदीची स्वच्छता करण्यात येणार आहे. यासाठी लागणारे साहित्य नाम फाऊंडेशनच्या सहकार्यातून मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. शनिवारी मुहूर्त झालेल्या या उपक्रमातून काचनूर ते येळाकेळी, असे एकूण नदीतील २८ किलोमिटरचा परिसर स्वच्छ करण्यात येणार आहे. या उपक्रमाला किती यश येईल, हे येत्या २० दिवसांत समोर येणार आहे. स्वच्छता झाल्यानंतर नदीकाठच्या गावकऱ्यांनी नदी आपली समजून तिची निगा राखण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
उपक्रमाकरिता सुमारे ३ कोटींचा खर्च
धाम नदीच्या स्वच्छतेकरिता साहित्य नाम फाऊंडेशनच्यावतीने पुरविण्यात येत असले तरी यंत्रांणा डिझेल देण्याचे काम जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे. याकरिता एकूण सुमारे ३ कोटींचा खर्च अपेक्षित असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.