पोलिसांच्या निवासस्थानामागे दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा खच
By admin | Published: September 12, 2016 12:42 AM2016-09-12T00:42:58+5:302016-09-12T00:42:58+5:30
येथील पोलीस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानामागेच दारूच्या रिकाम्या बाटलांचा खच पडला आहे.
सेलू : येथील पोलीस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानामागेच दारूच्या रिकाम्या बाटलांचा खच पडला आहे. या रिकाम्या बाटल्या कुणाच्या पोटात रिचविल्यानंतर येथे टाकण्यात आल्या, हा नवा प्रश्न समोर आला आहे. दारू पकडण्याची जबाबदारी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या वसाहतीच्याच मागे दारूच्या रिकाम्या बाटल्या आढळल्याने जिल्ह्यातील दारूबंदीचे खरे वास्तव समोर येत आहे.
सेलू सोसायटीच्या पडक्या गोदामाच्या मागे असलेल्या पोलीस वसाहतीच्या मागच्या बाजुला दारूच्या व शीतपेयांच्या रिकाम्या बाटल्या टाकण्यात आल्या आहेत. सेलू शहरातच दारूबंदीची लक्तरे वेशीवर टांगणारा हा प्रकार खुद्द पोलिसांच्या निवासस्थानाजवळच उघडकीस आल्याने चिंतनीय आणि चिंताग्रस्त करणारा आहे.
वर्धा जिल्ह्यातील दारूबंदीचा तमाशा काही नवा नाही; मात्र कायद्याच्या चौकटीत राहून लोकांनाही त्या प्रमाणे वागण्यासाठी कटीबद्ध करणाऱ्या पोलिसांच्या निवासस्थानाजवळ जनतेला दिसत असलेला हा दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा खच अनेक प्रश्न उपस्थित करीत आहे.
दारूबंदीसाठी कांगावा करीत असलेले पोलीस प्रशासन केवळ दिखावा खरीत असल्याची भावना सेलू शहरवासियांमध्ये बळावत आहे. ठाणेदार विलास काळे यांनी अशा पोलिसांना समज देण्याची गरज निर्माण झाली असून तशी मागणीही येथील नागरिक करीत आहे.(तालुका प्रतिनिधी)