चोरीच्या पैशातून खरेदी केली महागडी कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 11:26 PM2019-06-15T23:26:04+5:302019-06-15T23:27:40+5:30
अल्लीपूर पोलीस ठाण्यात त्रिनेव्हा इफ्रा. प्रोजेक्ट कंपनीतील रोखपाल आनंदन ए. शिवकुमार यांच्या तक्रारीवरून दाखल केलेल्या गुन्ह्याचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणातील आरोपी उमेश विनायक चव्हान याला पोलिसांनी समुद्रपूर येथून अटक केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अल्लीपूर : अल्लीपूर पोलीस ठाण्यात त्रिनेव्हा इफ्रा. प्रोजेक्ट कंपनीतील रोखपाल आनंदन ए. शिवकुमार यांच्या तक्रारीवरून दाखल केलेल्या गुन्ह्याचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणातील आरोपी उमेश विनायक चव्हान याला पोलिसांनी समुद्रपूर येथून अटक केली आहे. त्याने चोरीच्या पैशातून एक कार खरेदी केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.
कंपनीच्या कपाटातून चोरट्याने रोख पाच लाख रुपये चोरून नेल्याची तक्रार अल्लीपूर पोलीस ठाण्यात दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपीविरूद्ध भादंविच्या कलम ४५७, ३८० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तेव्हापासून अल्लीपूर व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस समांतर तपास करीत होते. दरम्यान खात्रीदायक माहितीच्या आधारे उमेश चव्हान याला समुद्रपूर येथून ताब्यात घेण्यात आले. त्याने गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली आहे. शिवाय चोरीच्या पैशातून एक कार खरेदी करीत इतर पैसे जवळ असल्याचे पोलिसांना सांगितले आहे. त्याच्याकडून पोलिसांनी एम. एच. ३१ सी. एम. ६३२७ क्रमांकाची कार व रोख ८७ हजार रुपये जप्त केले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अपर पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, पोलीस निरीक्षक निलेश ब्राह्मणे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक पंकज पवार, स.फौ. सलाम कुरेशी, पोहवा. स्वप्निल भारव्दाज, मनीष श्रीवास, कुणाल हिवसे, जगदिश डफ, प्रदिप वाघ, आत्माराम भोयर यांनी केली.
बौद्धविहारातील दानपेटी फोडली
केळझर : येथील बुद्धविहारातील दोन दानपेट्या अज्ञात चोरट्यांनी फोडून त्यातील रोख लांबविल्याची घटना शुक्रवारच्या रात्री घडली. शनिवारी पहाटे सदर घटना उघडकीस आल्याने भन्ते देवमित्र यांनी याबाबतची तक्रार सेलू पोलिसात दिली आहे. घटनास्थळी श्वानपथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. चोरट्यांनी बुद्धविहारातील दानपेटी काही अंतरावर नेत फोडल्या. शिवाय त्यातील रोख रक्कम घेऊन घटनास्थळावरून यशस्वी पळ काढला. सदर दोन्ही दानपेटीत सुमारे २२ हजार रुपये असल्याचा अंदाज तक्रारीतून वर्तविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. चार महिन्यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात सुद्धा अशाच पद्धतीने चोरट्यांनी दानपेटी पळवून नेली होती. तेव्हाही चोरटे गवसले नव्हते, हे विशेष.