मुदतबाह्य बॉम्ब निकामी करताना स्फोट, गावकऱ्याचा मृत्यू
By चैतन्य जोशी | Published: August 17, 2023 11:53 AM2023-08-17T11:53:12+5:302023-08-17T12:00:54+5:30
केंद्रीय दारुगोळा भंडाराच्या डिमॉलिश सेंटरवरील घटना
वर्धा : केंद्रीय दारुगोळा भंडाराच्या डिमॉलिश सेंटरवर मुदतबाह्य बॉम्ब निकामी करण्याचे काम सुरु होते. दरम्यान बॉम्बचा स्फोट झाल्याने एका गावाकऱ्याच्या पोटात लोखंडाचा तुकडा रुतला व त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज (दि. 17) सकाळी 9 वाजताच्या सुमारास घडली. योगेश किशोर नेरकर, राहणार सोनेगाव आबाजी असे मृतकाचे नाव आहे.
केंद्रीय दारुगोळा भंडाराच्या डिमॉलिश सेंटर हे क्षेत्र प्रतिबंधित क्षेत्र असूनही गावाकऱ्याने प्रवेश केला होता. तो परिसरातील एका झाडाखाली उभा असतांना बॉम्ब निकामी करण्याची प्रक्रिया सुरु होती. दरम्यान बॉम्बचा स्फोट झाल्यावर लोखंडी तुकडा उसळून गावाकऱ्याच्या पोटात शिरल्याने त्याचा मृत्यू झाला. डिमॉलिश करतांना जवळपास 20 ते 25 मजूर तेथे हजर होते सुदैवाने त्यांना कुठलीही इजा पोहोचली नाही. घटनेची माहिती मिळताच देवळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.