मुदत संपली; खड्डे मात्र ‘जैसे थे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 11:29 PM2017-12-16T23:29:40+5:302017-12-16T23:29:52+5:30

संपूर्ण रस्त्यांवरील खड्डे १५ डिसेंबरपर्यंत बुजविले जातील, अशी घोषणा करीत सार्वजनिक बांधकाम विभागाला बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आदेश दिले होते. निधी कमी पडणार नाही, असेही सांगितले होते; पण कंत्राटदारांची देयके अदा करण्यात आली नाहीत.

Expired; The pits were just 'like' | मुदत संपली; खड्डे मात्र ‘जैसे थे’

मुदत संपली; खड्डे मात्र ‘जैसे थे’

Next
ठळक मुद्देनिधीची चणचण : १२६८.५५ किमी मार्गावरील बीबीएम पूर्ण, कार्पेट, सिलकोट शिल्लक

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : संपूर्ण रस्त्यांवरील खड्डे १५ डिसेंबरपर्यंत बुजविले जातील, अशी घोषणा करीत सार्वजनिक बांधकाम विभागाला बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आदेश दिले होते. निधी कमी पडणार नाही, असेही सांगितले होते; पण कंत्राटदारांची देयके अदा करण्यात आली नाहीत. यामुळे खड्डे बुजविताना बीबीएम झाले; पण कार्पेट व सिलकोट ही कामे प्रलंबित असल्याने खड्डे बुजविण्याची कामे अर्धवटच झालीत. बांधकाम विभाग मात्र १२६८.५५ किमी अंतरातील खड्डे बुजविल्याचे सांगत आहे.
जिल्ह्यात वर्धा विभागांतर्गत ३७.४० किमी लांबीचे प्रमुख राज्य मार्ग आहेत. हे रस्ते वर्धा आणि देवळी तालुक्यांतर्गत येतात. यातील वर्धा तालुक्यातील ८.४ किमी तथा देवळी तालुक्यातील २९ किमी रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. जिल्ह्यात राज्य मार्गाची लांबी तब्बल ५९२.०५ किमी आहे. या राज्य मार्गातील वर्धा विभागांतर्गत ३६०.५० किमी तर आर्वी विभागातील २३१.५५ किमी मार्गावरील खड्डे बुजविले आहेत. जिल्ह्यात ६३९.१ किमी लांब प्रमुख जिल्हा मार्ग आहेत. यातील वर्धा विभागाने ४६९.६० किमी अंतरातील तर आर्वी विभागाने खड्डे १६९.५० किमी अंतरातील खड्डे बुजविले आहेत. आर्वी विभागांतर्गत १६ किमी रस्त्यांवरील खड्ड्यांची कामे शिल्लक आहेत. आर्वी बांधकाम विभागाने राज्य मार्गावरील खड्डे बुजविणाºया कंत्राटदारांना ३० लाखांचे तर प्रमुख जिल्हा मार्गावरील खड्डे बुजविणाºया कंत्राटदारांना २० लाख रुपये असे ५० लाख रुपये खड्ड्यांवर खर्च केले. संपूर्ण देयके अदा करण्यासाठी आणखी निधीची गरज आहे. वर्धा विभागाकडे तर अद्याप कंत्राटदारांची देयकेच आली नसल्याचे सांगण्यात आले. असे असले तरी वर्धा विभागाने १३ कोटी रुपयांची मागणी केली आहे. अद्याप शासनाकडून निधी आला नसल्याने उर्वरित कामे प्रलंबित आहेत.
बांधकाम मंत्र्यांच्या आदेशावरून बांधकाम विभागाने रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची कामे हाती घेतली. ही कामे करीत असताना दोन वर्षे सदर खड्ड्यांची देखभाल, दुरूस्तीची जबाबदारी कंत्राटदाराकडे देण्यात आली आहे. याच अटीवर आॅनलाईन निवीदा बोलवून कंत्राटदारांना कामे दिली; पण निधीच नसल्याने देयके अडकली आहेत.
खड्डे बुजविण्याचे प्राथमिक काम म्हणजे बीबीएम सध्या पूर्ण झाले आहे. याच कामाची देयके कंत्राटदारांना दिली नसल्याने उर्वरित कामे ते करणार की नाही, हा प्रश्नच आहे. यापूर्वीच कंत्राटदारांनी न्यायालयात देयके कामातील बीबीएम झाले; पण त्यानंतर करावयाची कार्पेट, सिलकोट ही कामे अद्याप करण्यात आलेली नाही. आता देयके मिळाल्याशिवाय ही कामे करणार नसल्याचे कंत्राटदारांनी म्हटले आहे. यामुळे बांधकाम विभागाची गोची झाली आहे. बांधकाम मंत्र्यांनी निधीची कमतरता पडणार नाही, असे म्हटले होते; पण जिल्ह्यातील कामे मात्र निधी मिळत नसल्याचेच अडकणार असल्याचे दिसून येत आहे.
आठ दिवसांत बुजविलेले खड्डे १५ दिवसांत उखडले
पुलगाव ते आर्वी मार्ग राज्य महामार्ग झाला आहे. यामुळे सदर रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे कंत्राट मंत्रालय स्तरावर कोल्हापूर येथील कंत्राटदार कंपनीला देण्यात आले. या कंपनीने आठ दिवसांत ४० किमी रस्त्यावरील खड्डे बुजविलेत; पण यानंतर लगेच या मार्गावर खड्डे पडलेत, हे वास्तव आहे. असाच प्रकार जिल्ह्यातील अन्य रस्त्यांबाबत पाहावयास मिळतो. आर्वी ते वर्धा या ६० किमी रस्त्यावरील मोठे खड्डे बुजविण्यात आले; पण लहान खड्डे जैसे थे ठेवण्यात आले आहेत. परिणामी, आर्वी मार्गावर १५ डिसेंबर नंतरही सुमारे एक ते दोन फुट लांबीचे खड्डे कायम आहेत.
४० टक्केच खड्ड्यांची डागडुजी
राज्य मार्ग, राज्य मार्ग तथा प्रमुख जिल्हा मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. हे संपर्ण खड्डे बुजविण्याचे आदेश होते; पण प्रत्यक्षात केवळ ४० टक्के खड्डे बुजविण्यात आलेत. उर्वरित ६० टक्के खड्डे अद्यापही बुजविण्यात आलेले नाहीत. यामुळे जिल्ह्यातील एकही रस्ता गुळगुळीत झाला नसल्याचेच दिसून येत आहे.
बीबीएममुळे रस्ते खडबडीत
रस्त्यावरील खड्डे बुजविताना प्रथम ७५ व ५० एमएम गिट्टीचे बीबीएम करावे लागते. यानंतर कार्पेट व नंतर सिलकोट करावे लागते. यातील केवळ बीबीएम ही कामे करण्यात आली आहेत.
कार्पेट व सिलकोट ही कामे अद्यापही झालेली नाहीत. यामुळे रस्ते खडबडीत, ओबडधोबड झाले आहेत. परिणामी, वाहन धारकांचा त्रास कायम आहे.
खड्डेमुक्त रस्ते दिवास्वप्नच, घोषणा हवेतच विरली
आकोली - ‘खड्डे दाखवा, हजार रुपये बक्षीस मिळवा’, अशी घोषणा बांधकाम मंत्र्यांनी केली होती. त्यांनी दिलेली १५ डिसेंबर ही मुदत संपली; पण रस्त्यावर खड्डे जैसे थे आहे. बुजविलेले खड्डे उखडले. यामुळे बांधकाम मंत्र्यांची घोषणा हवेतच विरल्याचे दिसते. जिल्हा मार्ग व ग्रामीण रस्त्याचे खस्ताहाल झाले. मागील वर्षी १५ डिसेंबर २०१६ ही मुदत दिली होती. खड्ड्यासोबत सेल्फी काढण्याचे आवाहन केले होते; पण २०१६ मध्ये खड्ड्यापासून मुक्ती मिळाली नाही. यामुळे १५ डिसेंबर २०१७ ही नवीन मुदत देत खड्ड्याबाबत माहिती देताच २४ तासात खड्डे बुजविण्याचे फर्माण सोडले; पण खड्डे बुजलेच नाही. यामुळे बांधकाम विभागाने मंत्र्याचे हसे केल्याची चर्चा आहे. खड्डे बुजविण्याची मोहीम घाईने सुरू केली. कामे निकृष्ट दर्जाची झाल्याने बुजविलेले खड्डे चारच दिवसांत उखडले. डांबराऐवजी आॅईलचा वापर केल्याचे मजूर सांगतात. यामुळे ‘खड्डेमुक्ती’त खिसे भरले गेल्याचेच दिसते.

Web Title: Expired; The pits were just 'like'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.