त्रिनेव्हा कंपनीत स्फोट; तळेगावातील १३ घरांना तडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 06:00 AM2020-02-19T06:00:00+5:302020-02-19T06:00:14+5:30
वर्धा-आर्वी मार्गाचे रुंदीरकरण व सिमेंटीकरणाचे काम सध्या सुरू आहे. या कामासाठी तळेगाव (रघुजी) भागातील त्रिनेव्हा कंपनीच्या डेऱ्यातून बांधकाम साहित्याचा पुरवठा केला जातो. याच कंपनीच्या माध्यमातून टेकडी परिसर पोखरला जात आहे. त्यासाठी वेळोवेळी बारूदचा वापर करून ब्लास्ट केले जात आहे. अशातच आज बारुदचा वापर करून ब्लास्ट करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
खरांगणा (मो.) : आर्वी-वर्धा मार्गावरील तळेगाव (रघुजी) शिवारात त्रिनेव्हा कंपनीच्या कामगारांनी आपला डेरा टाकला आहे. येथेच उत्खन्न करून बांधकाम साहित्य इतर ठिकाणी नेले जाते. याच कंपनीच्या आवारात मंगळवारी सकाळी ११ वाजता उत्खन्नासाठी बारुदचा वापर करून ब्लास्ट करण्यात आले. याच ब्लास्टच्या हादऱ्यामुळे तळेगाव (रघुजी) गावातील तब्बल १३ घरांना तडे गेल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी कंपनीच्या मुख्य प्रवेश द्वारासमोर जड वाहने थांबवून आपला रोष व्यक्त केला. पोलिसांनी मध्यस्ती केल्यावर आंदोलनकर्त्यांनी आपले आंदोलन मागे घेतले. असे असले तरी या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
वर्धा-आर्वी मार्गाचे रुंदीरकरण व सिमेंटीकरणाचे काम सध्या सुरू आहे. या कामासाठी तळेगाव (रघुजी) भागातील त्रिनेव्हा कंपनीच्या डेऱ्यातून बांधकाम साहित्याचा पुरवठा केला जातो. याच कंपनीच्या माध्यमातून टेकडी परिसर पोखरला जात आहे. त्यासाठी वेळोवेळी बारूदचा वापर करून ब्लास्ट केले जात आहे. अशातच आज बारुदचा वापर करून ब्लास्ट करण्यात आला. याच ब्लास्टच्या हादऱ्यामुळे तळेगाव (रघुजी) येथील सुमारे तेरा घरांना तडे गेले आहेत. नुकसान झालेल्यांमध्ये प्रफुल सरदार, मधुकर कालोकार, चक्रधर उके, सुनील रुईकर, दशरथ बोरकर, गजू भोयर, आदिनाथ रंगारी आदींचा समावेश आहे. ब्लास्टला हादरा इतका भयावह होता की जनू भुकंपच आल्याचे ग्रामस्थांना जाणवले. त्यानंतर ग्रामस्थांनी स्वत:ला सावरून कंपनीच्या मुख्यद्वाराकडे आपला मोर्चा वळविला. संतप्त ग्रामस्थांनी कंपनी प्रशासनाच्या विरोधात वाहन रोखून नारेबारी करीत नुकसान भरपाईची व कंपनीचा डेरा हटविण्याची मागणी रेटली. दरम्यान खरांगणा पोलिसांनी आंदोलन स्थळ गाठून चर्चा केली. पोलिसांच्या मध्यस्तीअंती आंदोलनकर्त्यांनी आपले आंदोलन मागे घेतले.
वारंवार तक्रार; पण कारवाई शून्य
त्रिनेव्हा कंपनीच्यावतीने ब्लास्ट करून टेकडी पोखरून मुरूम व दगडाची उचल केली जात आहे. इतकेच नव्हे तर काळ्या दगडापासून गिट्टी बनविल्या जात आहे. बारूदचा वापर करून केले जाणारे ब्लास्ट परिसरातील नागरी वसाहतीसाठी धोकादायक ठरत असल्याने हा मनमर्जी कारभार बंद करण्याच्या मागणीचे संबंधित अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी वेळोवेळी दिले. परंतु, अधिकारीही दुर्लक्ष करण्यात धन्यता मानत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.
त्रिनेव्हा कंपनीत करण्यात आलेल्या ब्लास्टमुळे गावातील सुमारे १३ घरांना तडे गेले आहे. यामुळे ग्रामस्थांचे मोठे नुकसान झाले आहे. ग्रा.प.ने या कंपनीला केवळ मुक्काम व मुरुम व मातीची उचल करण्यासाठी नाहरकत प्रमाणपत्र दिले आहे. परंतु, बारुदचा वापर करून ब्लास्ट केले जात असल्याचे लक्षात येताच हा प्रकार बंद करण्याच्या लेखी सूचना या कंपनीला देण्यात आल्या आहेत. परंतु, कंपनी त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे आजच्या प्रकाराने दिसून येते. आठवड्यातून दोन वेळा ही कंपनी रात्री-बेरात्री ब्लास्ट करीत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. जिल्हाधिकाºयांनी पुढाकार घेऊन नुकसानग्रस्तांना भरपाई द्यावी. शिवाय ब्लास्टींगचा प्रकार थांबवावा.
- प्रभा कालोकार, सरपंच, तळेगाव (रघुजी).
ग्रा.पं.च्या लेखी सूचनांकडे कंपनीची पाठ
बारुदचा वापर करून ब्लास्ट करून गौण खनिजाचे उत्खनन हे एखाद्याच्या जीवावर बेतू शकत असल्याने ग्रा.प. प्रशासनाने त्रिनेव्हा कंपनी प्रशासनाला बारूदचा वापर करून ब्लास्ट करण्यात येऊ नये अशा लेखी सूचना दिल्या होत्या. मात्र, त्रिनेव्हा कंपनीकडून ग्रामपंचायतीच्या लेखी सूचनांकडे दुर्लक्ष करण्यातच धन्यता मानत असल्याचे तळेगाव (रघुजी) येथील उपसरपंच धनराज गळहाट, यशवंत चकाले, रमेश वाढई, कवडू रामटेके यांनी यावेळी सांगितले.