गैरप्रकार करणाऱ्या सचिवाची हकालपट्टी
By admin | Published: September 21, 2016 01:13 AM2016-09-21T01:13:40+5:302016-09-21T01:13:40+5:30
मसाळा ग्रामपंचायत मालकीच्या वाहनात ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांकडून मुरूम भरून स्वत:च्या घरी नेणे,
ग्रा.पं. म्हसाळा येथील प्रकार : १० सदस्यांनी केला पाठपुरावा
वर्धा : मसाळा ग्रामपंचायत मालकीच्या वाहनात ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांकडून मुरूम भरून स्वत:च्या घरी नेणे, घरातील कामे करून घेणे, आदी कामांत दोषी आढळल्याने मसाळा ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी एम. सी. गोल्हर यांची ग्रामपंचायतीतून हकालपट्टी करण्यात आली आहे.
शासनाच्या विविध निधीच्या रकमेतून ग्रामपंचायत परिसराचा विकास करण्यासाठी नेमल्या गेलेले मसाळा ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी एम. सी. गोल्हर हे मागील सहा महिन्यांपासून ग्रामपंचायतच्या मालकीच्या वाहनासह कर्मचाऱ्यांनाही स्वत:च्या घरी राबवित होते. ही बाब उघड होताच येथील ग्रा.पं. सदस्यांनी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला. दरम्यान राजू टिपले, राजू धमाणे, चंदा वाळके, वनिता टिपले, सुरेखा सरोदे, ज्योत्स्ना गवई, सागर मरघडे, पद्माकर नगराळे, चंद्रकला खंडाते, कल्पना मानकर या सदस्यांनी पाठपुरावा करून तक्रार दाखल केली.
जि. प. तत्कालीन शिक्षण सभापती मिलिंद भेंडे यांनी सर्वसाधारण सभेत गोल्हरवर कारवाईची मागणी रेटून धरली होती. सभाध्यक्ष विलास कांबळे यांनी चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. गुरुवारी पुन्हा जि.प.च्या स्थायी समितीच्या सभेत सदस्य राणा रणनवरे यांनीही सदर मागणी रेटून धरली. तत्पूर्वी पं.स.चे विस्तार अधिकारी यांनी ग्रा.पं. कर्मचारी शंकर वाघाडे, विलास कोडापे, विनोद कोडापे, वसंता शंभरकर आदी कर्मचाऱ्यांसह तक्रारकर्ते राजू टिपले, राजू धमाणे यांचेही बयाण नोंदविले होते. या दोन्ही बयानाच्या आधारावर चौकशी अहवाल तयार करण्यात आला.सदर अहवालावरून म्हसाळा येथील ग्रामविकास अधिकारी एम. सी. गोल्हर यांची ग्रामपंचायतीतून हकालपट्टी करण्यात आली.(शहर प्रतिनिधी)