गोदावरी रेती घाटातून अतिरेकी उपसा
By admin | Published: July 16, 2015 12:12 AM2015-07-16T00:12:18+5:302015-07-16T00:12:18+5:30
प्रशासनाकडून जिल्ह्यातील रेती घाटांचे लिलाव केले जातात. यातून महसूल प्राप्त होतो; पण रेती माफियांकडून अतिरेकी उपसा केला जातो.
लिलाव झाला नसताना माफियांचा उच्छाद : कारवाईसाठी ग्रामस्थांचे जिल्हाधिकाऱ्यांना साकडे
वर्धा : प्रशासनाकडून जिल्ह्यातील रेती घाटांचे लिलाव केले जातात. यातून महसूल प्राप्त होतो; पण रेती माफियांकडून अतिरेकी उपसा केला जातो. यामुळे नदी पात्र धोक्यात आले आहे. सध्या आष्टी तालुक्यातील गोदावरी या लिलाव न झालेल्या घाटातून सर्रास रेतीचा उपसा केला जात असल्याची तक्रार ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांच्याकडे केली आहे. याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणीही ग्रामस्थांनी निवेदनातून केली आहे.
आष्टी तालुक्यातील गोदावरी या घाटाचा लिलाव करण्यात आलेला नाही. इस्माईलपूर येथील लिलाव झाला असून रेतीमाफीयांद्वारे गोदावरी घाटातूनही रेतीचा उपसा केला जात आहे. केवळ मजुरांकडूनच नव्हे तर जेसीबी, पोकलॅण्ड तसेच बोटींच्या माध्यमातून सर्रास रेतीचा उपसा केला जात आहे. या प्रकारामुळे नदी पात्रच धोक्यात आले आहे. रेतीच्या वाहतुकीसाठी नदी पात्रातून रस्ता करण्यात आला आहे. याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने रेतीमाफीयांचे फावल्याचे दिसते.
गोदावरी या रेतीघाटाचा लिलाव झाला नसताना विवेक ठाकरे आणि अनिल मानकर हे घाटधारक रेतीचा उपसा करीत असल्याच्या तक्रारी गोदावरी येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केल्या आहेत. भाजपचे अल्पसंख्यक सेल जिल्हा उपाध्यक्ष नानकसिंग बावरी यांनी यापूर्वी ३० जून रोजीही जिल्हाधिकाऱ्यांना तक्रार केली होती; पण अद्याप कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. यामुळे प्रशासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे. जिल्हाधिकारी व खनिकर्म अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत कारवाई करावी व वसुली करावी, अशी मागणीही ग्रामस्थांनी केली आहे.(कार्यालय प्रतिनिधी)