अतिरिक्त घेतलेले पैसे शेतकऱ्यांना परत
By admin | Published: September 17, 2015 02:48 AM2015-09-17T02:48:54+5:302015-09-17T02:48:54+5:30
तालुक्यातील शेतकऱ्यांकडे सोने गहाणातून थकलेल्या पैश्यांचा शासनाने मुद्दल व व्याजासहित भरणा करूनसुद्धा ...
सावकारांचे धाबे दणाणले : पुलगावच्या सावकारांचा प्रस्ताव नागपूर उच्च न्यायालयाने फेटाळला
हरिदास ढोक देवळी
तालुक्यातील शेतकऱ्यांकडे सोने गहाणातून थकलेल्या पैश्यांचा शासनाने मुद्दल व व्याजासहित भरणा करूनसुद्धा संबंधित कास्तकारांची अतिरिक्त व्याज घेऊन लूट करण्यात येत आहे. अश्या प्रकारची बातमी ‘लोकमत’ने प्रसिद्ध करताच देवळीतील सावकारांचे धाबे दणाणले आहे. ज्या कास्तकारांनी काही दिवसांपूर्वी सोने सोडविले अशांना जास्तीच्या घेतलेल्या पैशांचा परतावा करण्यात येत आहे. तसेच नव्याने गहाण सोडविणाऱ्यांकडून काहीही पैसे न घेता सोने परत केले जात आहे. प्रत्यक्षात याआधी गहाण परत मागण्यासाठी गेलेल्या कास्तकारांची अतिरिक्त व्याजापोटी हजारो रूपये घेवून लुबाडणूक करण्यात येत होती.
शासनाने जाहीर केलेल्या धोरणात्मक कार्यक्रमानुसार देवळी तालुक्यातील ७०० सावकारी प्रकरणांना अंतिम मंजुरी देण्यात आली. यापैकी पहिल्या टप्प्यात देवळीतील दोन सावकारांकडे असलेल्या १९९ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. जिल्ह्यात वाटप करण्यात आलेल्या ५० लाखांपैकी एकट्या देवळीला २४ लाख देण्यात आले. तालुक्यातील उर्वरित ५०० सावकारी प्रकरणे काही त्रुटी व मनुष्यबळाअभावी लेखापरीक्षकाकडे विचाराधीन ठेवण्यात आली आहे. या प्रकरणातील एक ते सव्वा कोटी रूपये पुन्हा या तालुक्याला मिळणार असल्याचे सहायक निबंधक एस. पी. गुघाणे यांनी सांगितले.
सावकारी कर्जमाफीचे पैसे सावकारांच्या खात्यात जमा न करता कास्तकारांच्या खात्यात जमा करण्यात यावे, सावकारांकडे गहाण ठेवलेल्या दस्तावेजामध्ये सदर व्यक्ती हा कुठेही शेतकरी असल्याचा उल्लेख नसल्यामुळे व्याजाचा दर वाढवून देण्यात यावा यासह इतर आक्षेप नोंदवून पुलगाव येथील सावकारांनी नागपूर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याप्रकरणी न्यायालयाने शासनाची बाजू घेवून सावकरांचा प्रस्ताव फेटाळत असल्याचा निर्णय दिला. त्यामुळे पुलगाव व परिसरातील सावकरांकडे थांबलेली गहाणाची प्रकरणे ताबडतोब निबंधक कार्यालयात सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
काहींची शेती तालुक्यात असताना त्यांनी इतर तालुक्यात किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी ती गहाण ठेवली असेल तरी अशांना योजनेतून अपात्र ठरवू नये, जिल्ह्यात कार्यक्षेत्र ठरवून अश्यांच्या गहाणांचा परतावा करण्यात यावा, ही मागणी घेऊन विदर्भातील १२ आमदारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन साकडे घातले होते. त्यामुळे अशा कास्तकारांच्या प्रकरणांना दिलासा मिळणार आहे आजघडीला तालुक्यातील १९९ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला आहे. यामध्ये २१ लाख ८० हजार मुद्दल व व्याजाचे २ लाख १९ हजार २७८ रूपये असे एकूण २४ लाख माफ करण्यात आले आहे. ३० नोव्हेंबर २०१४ पर्यंत थकित असलेले कास्तकार व ज्यांनी आजच्या तारखेपर्यंत गहाण सोडविले नाही, अश्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे. या कालावधीत गहाण सोडविलेल्यांना योजनेतून बाद केले आहे. अश्यांनाही योजनेत सामावून घेण्याची मागणी आहे. सावकार व निबंधक कार्यालयातील काहींच्या साटेलोट्यामुळे हिशोबवहीत बोगस कास्तकारांची खतावणी करून उखळ पांढरे करून घेण्याची शक्यता आहे.