दोन मार्गांवर दीड कोटींची अतिरिक्त भाडे वसुली
By Admin | Published: June 17, 2017 12:36 AM2017-06-17T00:36:38+5:302017-06-17T00:36:38+5:30
येथील बसस्थानक ते वायगाव (निपाणी) चौरस्ता मार्गे वर्धा बस स्थानकाचे अंतर प्रत्यक्षात
राज्य परिवहन महामंडळाचा प्रताप : वर्धा व जाम प्रवासी अंतराच्या फेरमोजणीची गरज
भास्कर कलोडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : येथील बसस्थानक ते वायगाव (निपाणी) चौरस्ता मार्गे वर्धा बस स्थानकाचे अंतर प्रत्यक्षात ४१ किमी असतांना ते ४२ पेक्षा अधिक किलोमीटर दाखवून प्रति प्रवासी एक टप्याचे ६ रुपए ३० पैसे अधिक वसूल केल्या जात आहे. असाच प्रकार हिंगणघाट जाम चौरस्ता प्रवासासाठी अर्ध्या टप्प्याचे भाडे अधिक घेतल्या जात आहे. यातून वर्षांला जवळपास दीड कोटींच्या अतिरिक्त भाडे वसुलीचा फटका प्रवाशांना बसत आहे. त्यामुळे या दोन्ही प्रवासी अंतराची फेरमोजनी करून प्रवाशांना दिलासा देण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.
वर्धा हे जिल्ह्याचे ठिकाण असून अहेरी, चंद्रपूर, राजुरा, गडचिरोली, वरोरा, वणीकडुन हिंगणघाट मार्गे वर्धा, परतवाडा, पुलगाव, शिर्डी, औरंगाबाद, अकोला, अमरावती, शेगांव, दर्यापूर, आर्वी, यवतमाळ, आष्टी, आकोटकडे आवागमन करणाऱ्या ११८ बसफेरीद्वारे दररोज जवळपास ५ हजार प्रवाशांचे आवागमन होते आहे. प्रती प्रवासी सव्वा सहा रुपये प्रमाणे दररोज ३३ हजार तर वर्षाला अंदाजे १ कोटी २० लाखांचे अतिरिक्त प्रवासी भाडे वसुली हिंगणघाट वर्धा मार्गावर राज्य परिवहन महामंडळाकडून होत आहे.
पूर्वी हिंगणघाट बस स्थानकातून सुटणारी बस वायगाव बस स्थानकावरुन चौरस्ता मार्गे वर्धा बस स्थानक जात असताना त्याचे अंतर ४५.३ किमी. असल्याचे दर्शवून आठ टप्प्याचे प्रवासी भाडे आकारल्या जात होते. गत अनेक वर्षांपासून ही बस वायगाव बसस्थानकावर न जाता वायगाव चौरस्ता मार्गे वर्धा बस स्थानकावर पोहचते. या मार्गे हिंगणघाट बस स्थानकातील फलाटापासून नंदोरी चौक वणा नदी पूल, धोत्रा चौरस्ता, वायगाव चौरस्ता मार्गे वर्धा बस स्थानकावरील फलाटापर्यंतचे अंतर ४१ किमी आहे. प्रती सहा किमी अंतराचा एक टप्पा या प्रमाणे सात टप्याच्या ४२ किमीच्या आंत दोन्ही बस स्थानक येत आहे; परंतु बस भाडे मात्र आजही आठ टप्प्याचे वसूल केल्या जात आहे.
हिंगणघाट -जाम मार्गावरही तोच प्रकार
हिंगणघाट जाम चौरस्ता प्रवासी अंतर १२ किमीच्या आत असताना जुने बसस्थानक ते जाम चौरस्ता बस स्थानकापर्यंतचे अंतर १२.९ की. मी. असल्याचे दर्शवून दोन टप्प्यांऐवजी अडीच टप्प्याच्या बस भाड्याची वसूली केली जात आहे. हिंगणघाटवरुन नागपूर, चंद्रपूर, हैदराबाद, पांढरकवडा, गिरड, उमरेडकडे आवागमन करणाऱ्या ३१७ बस फेरीद्वारे जाम चौरस्ता पर्यत प्रवास करून इतरत्र आवागमन करणाऱ्यांची संख्या दररोज जवळपास अडीच हजार आहे. अशास्थीतीत प्रती प्रवासी तीन रुपये प्रमाणे दररोज साडे सात हजार तर वर्षाला अंदाजे ३० लाखांची अतिरिक्त प्रवासी भाडे वसुली या मार्गावर राज्य परिवहन महामंडळाकडून होत आहे. या दोन्ही मार्गाची अंतर मोजणी आता कालबाह्य झाली असून नव्याने अंतर मोजणी अत्यावश्यक आहे.