पॉवरग्रीड प्रशासनाची अतिरेकी कारवाई
By admin | Published: February 3, 2017 01:51 AM2017-02-03T01:51:58+5:302017-02-03T01:51:58+5:30
स्थानिक पॉवरग्रीड कॉर्पोरेशन प्रशासनाच्या टॉवर उभारणीच्या अतिरेकी कारवाईमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करीत आहेत.
एकाच शेतात तीन टॉवर
देवळी : स्थानिक पॉवरग्रीड कॉर्पोरेशन प्रशासनाच्या टॉवर उभारणीच्या अतिरेकी कारवाईमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करीत आहेत. कंपनीच्यावतीने ऐन हंगामात टॉवर उभारणीचे काम करण्यात येत आहे. यामुळे यामध्ये शेतातील गहू, हरबरा, कपासी पिकाची नासाडी होत आहे. याची माहिती पोलीस प्रशासनाला दिली असली तरी त्यांच्याकडून याकडे दुर्लक्ष होत आहे.
चिकणी शिवारातील अशोक कारोटकर यांच्या १५ एकरातील शेत सर्व्हे न. १६७ व १२६/२ मध्ये तीन टॉवरची उभारणी करुन पीक उद्ध्वस्त केले जात आहे. पॉवरग्रीड प्रशासनाने या कारवाई दरम्यान पोलिसांची मदत मागितल्याने संबंधित शेतकरी भयग्रस्त आहे. एकाच शेतात तीन टॉवरची उभारणी करून पॉवरग्रीड प्रशासन अन्याय करीत असल्याचा आरोप कारोटकर यांचा आहे. जिल्हाधिकारी कार्यालय सुद्धा या कारवाईला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप आहे. शेतकऱ्यांच्या मर्जीशिवाय होणारा हा प्रकार अतिरेकी आहे. त्यामुळे पीकमालाच्या नुकसानाची भरपाई देण्यासोबतच टॉवर उभारणीचा मोबदला मिळण्यात यावा, अशी मागणी संबंधित कास्तकाराने केली आहे. शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा हा प्रकार त्वरीत थांबविण्यात यावा, अशी मागणीसुद्धा कारोटकर यांनी केली आहे.(प्रतिनिधी)