दुष्काळातही रस्ता कामांवर पाण्याचा मुबलक वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 09:35 PM2019-03-11T21:35:35+5:302019-03-11T21:35:51+5:30

वर्धा जिल्ह्यात यावर्षी अत्यल्प पाऊस झाला. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणीटंचाईचे संकट तीव्र झाले आहे. नद्या आटल्यामुळे वर्धा शहरासह परिसरातील ११ गावांना पाच ते सात दिवसांआड पाणीपुरवठा केला जातो, तर दुसरीकडे शहरात सुरू असलेल्या सीमेंट रस्ता बांधकामांवर मोठ्या प्रमाणावर पाण्याचा वापर केला जात आहे.

Extreme use of water for road work in drought | दुष्काळातही रस्ता कामांवर पाण्याचा मुबलक वापर

दुष्काळातही रस्ता कामांवर पाण्याचा मुबलक वापर

Next
ठळक मुद्देवर्धा शहरातील वास्तव : शहरी, ग्रामीण नागरिक तहानलेले

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : वर्धा जिल्ह्यात यावर्षी अत्यल्प पाऊस झाला. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणीटंचाईचे संकट तीव्र झाले आहे. नद्या आटल्यामुळे वर्धा शहरासह परिसरातील ११ गावांना पाच ते सात दिवसांआड पाणीपुरवठा केला जातो, तर दुसरीकडे शहरात सुरू असलेल्या सीमेंट रस्ता बांधकामांवर मोठ्या प्रमाणावर पाण्याचा वापर केला जात आहे. टॅँकरद्वारे पाणी आणून ते रस्त्याच्या कामात तयार करण्यात आलेल्या आळ्यांमध्ये टाकले जात आहे. एकट्या वर्धा शहरात ही परिस्थिती नाही, तर राष्ट्रीय महामार्गावरही जेथे-जेथे काम सुरू आहे, तेथे-तेथे असेच मुबलक पाणी वापरले जात आहे. शहर परिसरातील नागरिक पाण्यापासून वंचित असताना विकासकामांवर पाणी वापरण्याचा अट्टहास का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
वर्धा शहरातील सिव्हिल लाईन भागात शासनातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची निवासस्थान आहेत. या मार्गावर असलेल्या पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर सध्या सिमेंट रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. या कामावर मुबलक प्रमाणात पाणी टाकले जात आहे. या पाणी वापरासाठी पाईपलाईनही लावण्यात आली आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने वर्धा शहरासह नालवाडी, साटोडा, सिंदी (मेघे), बोरगाव (मेघे), उमरी (मेघे), आदी भागांत पाणी कपात करण्याचे धोरण अवलंबिले आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असल्याचे चित्र आहे.
पाणी वापरावर हवी बंधने
दुष्काळी परिस्थिती उद्भवल्यास पाण्याच्या उपस्यावर तसेच त्याच्या गैरवापरावर बंधने घातली जातात. जिल्ह्याधिकाऱ्यांना याबाबतचे अधिकार आहे. मात्र, वर्धा शहरासह परिसरातील ग्रामीण भागात अनेक नागरिक आपल्या घरातील बोअरवेलचे पाणी सकाळी व सायंकाळी अंगणात शिंपतात, गाड्या धुतात, काहींनी तर कॅनमध्ये पाणी भरून ते विक्री करण्यासाठी पाठविण्याचा धंदाही सुरू केला आहे. या प्रकारावर जिल्हा प्रशासनाचे मात्र नियंत्रण नाही. ग्रामपंचायत प्रशासन निवडणूक कामात व्यस्त झाले आहे.

Web Title: Extreme use of water for road work in drought

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.