वर्धा नगरपालिकेच्या आरोग्य विभागातील मुख्य पर्यवेक्षकाचे फेसबुक अकाऊंट हॅक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2020 03:48 PM2020-05-19T15:48:22+5:302020-05-19T15:49:37+5:30

वर्धा नगरपालिकेतील आरोग्य विभागात मुख्य पर्यवेक्षक म्हणून कार्यरत असलेल्या अशोक ठाकूर यांचे फेसबुक अकाऊंट अज्ञाताने हॅक केल्याची घटना येथे घडली.

Facebook account of Chief Supervisor of Health Department of Wardha Municipality hacked | वर्धा नगरपालिकेच्या आरोग्य विभागातील मुख्य पर्यवेक्षकाचे फेसबुक अकाऊंट हॅक

वर्धा नगरपालिकेच्या आरोग्य विभागातील मुख्य पर्यवेक्षकाचे फेसबुक अकाऊंट हॅक

googlenewsNext
ठळक मुद्देसायबर सेलकडे तक्रारहॅकरने अनेकांना केली पैशाची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: नगरपालिकेतील आरोग्य विभागात मुख्य पर्यवेक्षक म्हणून कार्यरत असलेल्या अशोक ठाकूर यांचे फेसबुक अकाऊंट अज्ञाताने हॅक केल्याची घटना येथे घडली. आरोपी इतक्यावरच थांबला नाही तर त्याने ठाकूर यांच्या फ्रेन्ड लिस्ट मध्ये असलेल्या व्यक्तींशी चॅटिंग करून अतिशय महत्त्वाचे काम असल्याचे सांगून अनेकांना पैशाची मागणी केली. हॅकरच्या या खोट्या बतावणीला ठाकूर यांच्या फ्रेड लिस्टमध्ये असलेला चैतन्य गावंडे बळी पडला. त्याची तब्बल १५ हजाराने फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी सायबर सेलकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.
अशोक ठाकूर यांचे फेसबुक अकाऊंट हॅक करून त्यांच्या फ्रेड लिस्ट मधील अनेकांशी आरोपीने चॅटिंग केली. या चॅटिंग दरम्यान हॅकरने हिंदी भाषेत संवाद साधून अतिशय महत्त्वाच्या कामासाठी पैशाची नितांत गरज असल्याचे सांगितले. शिवाय सदर संवादादरम्यान हॅकरने एक बँक खाते क्रमांक देत आॅनलाईन पद्धतीने यात पैसे टाकण्याचे सुचविले. हॅकरच्या याच खोट्या बतावणीला मूळचा वर्ध्यातील रहिवासी असलेला आणि सध्या नवी मुंबई येथे वास्तव्यास असलेला चैतन्य गावंडे हा बळी पडला. त्याने हॅकरच्या म्हणण्यावर विश्वास ठेऊन १५ हजाराची रक्कम आॅनलाईन पद्धीने हॅकरने दिलेल्या बँक खात्यात वळती केल्याचे अशोक ठाकूर यांनी सांगितले. मध्यरात्रीपासून अनेकांचे फोन आल्यानंतर आपले फेसबुक अकाऊंट हॅक झाल्याचे लक्षात येताच अशोक ठाकूर यांनी सुरूवातीला शहर पोलीस स्टेशन तर नंतर वर्धा पोलीस अधीक्षक कार्यालयातील सायबर पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली. त्यानंतर सायबर सेल मधील तज्ज्ञांनी हॅक झालेल्या फ्रेसबुक अकाऊंटचा युजर व पासवर्ड क्रमांक बदलून दिला. शिवाय सदर प्रकार नेमका काय याची चौकशी सुरू केली आहे.

हॅकरने केला संवाद
अशोक ठाकूर यांच्या फेसबुक वरील फ्रेड लिस्टमध्ये असलेल्या माजी नगराध्यक्ष नीरज गुजर, कंत्राटदार बाबा जाकीर, भाजप शहर प्रमुखाचे पुत्र अंकीत परियाल, किराणा व्यावसायिक मिलिंद गांधी, माजी नगरसेविकेचे पुत्र अमित जैन, शिवाय एक पत्रकार या वर्धा शहरातील दिग्गजांसह ठाकूर यांच्या निकटवतीर्यांशी संवाद साधून पैशाची मागणी केली.

वर्धा न.प. आरोग्य विभागातील मुख्य पर्यवेक्षक अशोक ठाकूर यांचे फेसबुक अकाऊंट अज्ञाताने हॅक करून त्यांच्या फ्रेड लिस्टमधील व्यक्तींना पैशाची मागणी केल्याची तक्रार आम्हाला प्राप्त झाली आहे. सदर प्रकरणी चौकशी सुरू करण्यात आली आहे. शिवाय त्यांच्या फेसबुकचा युजर व पासवर्ड बदलून देण्यात आला आहे. या प्रकरणी चौकशीअंती गुन्हा दाखल करण्यात येईल.
- नीलेश ब्राह्मणे, पोलीस निरीक्षक, सायबर सेल, वर्धा.
 

Web Title: Facebook account of Chief Supervisor of Health Department of Wardha Municipality hacked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.