फेसबुकवरून बदनामी करणाऱ्याला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2018 11:34 PM2018-12-02T23:34:50+5:302018-12-02T23:35:34+5:30
फेसबुकवर बनावट अकाऊं ट तयार करुन त्यावर अश्लिल छायाचित्र प्रसारीत केले. त्यामुळे समाजात बदनामी झाली असून सामाजिक प्रतिष्ठेला धक्का लागल्याची तक्रार करण्यात आली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : फेसबुकवर बनावट अकाऊं ट तयार करुन त्यावर अश्लिल छायाचित्र प्रसारीत केले. त्यामुळे समाजात बदनामी झाली असून सामाजिक प्रतिष्ठेला धक्का लागल्याची तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी नागपुरातील एका युवकाला अटक केली असून ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने केली आहे.
श्रीकांत उर्फ स्वीकार कैलासराव उकीनकर (२७) रा. रामनगर, तेलंगखेडी, नागपूर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. फेसबुकवर बनावट अकाऊंटच्या सहाय्याने अश्लिल छायाचित्र अपलोड करुन बदनामी करीत असल्याची तक्रार २० सप्टेंबर २०१८ ला रामनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. या तक्रारीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेने तपास सुरु करुन पोलीस निरिक्षक निलेश ब्राम्हणे यांनी एक विशेष पथक तयार केले. ते पथक नागपूरला पाठविण्यात आले. पथकाने आरोपीचा काम करीत असलेल्या कंस्ट्रक्शन कंपनीच्या कार्यालयात तसेच त्याचे राहते ठिकाणी शोध घेतला असता तो काम करीत असलेल्या कार्यालयातच दिसून आला. त्याला विचारपूस केली असता कोणतीही कबुली दिली नाही. त्यामुळे पोलिसासोबत असलेल्या सायबर टिमने त्याच्या मोबाईल व गुगल अकाऊंटची पाहणी करुन विवादास्पद फोटो त्याच्या मोबाईल व गुगल अकाऊंटवर असल्याचे निष्पन्न केले. तसेच या तांत्रीक पुराव्याच्या आधारे आरोपीने हा गुन्हा केल्याचेही तपास पथकाने पटवून दिले. यावरुन आरोपी श्रीकांत उकीनकर याला अटक केली असून त्याच्याकडून १० हजार रुपये किंमतीचा एक मोबाईल जप्त केला. आरोपीला पुढील तपासाकरिता रामनगर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. ही कारवाई प्रभारी पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, उपविभागीय पोलीस अधीकारी दिनेशकुमार कोल्हे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक निलेश ब्राम्हणे, अशोक चौधरी, शहर पोलीस स्टेशनचे चंद्रकांत मदने यांच्या निर्देशाप्रमाणे निर्मला किन्नाके,सलाम कुरेशी,स्वप्नील भारव्दाज, कुलदीप टाकसाळे, अक्षय राऊत, दिनेश बोथकर, लोभेश गाढवे, निलेश कट्टोजवार, अनुप कावळे, जगदीश डफ, अभिजीत वाघमारे, प्रदीप वाघ यांनी केली.
सायबर सेलची मुख्य भूमिका
या गुन्ह्याचा तपास तांंत्रीक स्वरुपाचा असल्याने सायबर सेलची मदत घेण्यात आली. आरोपीने फेसबुक अकाऊंट चालविताना वापरलेल्या सर्व तांत्रीक सेवा पुरविणाºया कंपन्यांकडे सातत्याने पाठपुरावा करुन फेसबूक व आयडीया कंपनीकडून माहिती प्राप्त केली. त्यावरुन सदर फेसबूक अकाऊंट हे नागपूर येथील श्रीकांत उकीनकर नावाचा व्यक्ती वापरत असल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाले.त्यानुसार पुढील तपासाला गती मिळाली. या गुन्ह्यातील आरोपीने फिर्यादी तसेच तिच्या पतीच्या व्हॉट्सअॅप व फेसबूक अकाऊंटवरुन फिर्यादीचे फोटो कॉपी केले व ते गुन्ह्यात वापरले. त्यामुळे सोशल मिडीयाचा वापर करतांना आपल्या अकाऊंटची प्रायव्हसी सेटींग करुन घ्यावी, असे आवाहन सायबर सेलच्यावतीने करण्यात आले.