गौरक्षण वाॅर्डात सुरू होते बनावट कॉल सेंटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2022 05:00 AM2022-07-03T05:00:00+5:302022-07-03T05:00:06+5:30
तुषार दिलीप कोल्हे (रा. नागपूर) याने रुचिका दादाराव खोब्रागडे (रा. आमगाव (जं.), ता. सेलू) हिच्यासोबत संगनमताने रिश्ते गाईड डॉट कॉम विवाह संस्थेची फ्रेन्चायसी घेऊन सोशल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मुला-मुलींचे फोटो व वैयक्तिक माहितीची चोरी करून त्यांची बनावट प्रोफाईल तयार करत होते. यासाठी बनावट मोबाईल क्रमांकाचा वापर केला जातो. तसेच ज्या ग्राहकाची पसंती आली, त्यांना खोटी माहिती पुरवून स्वत:च्या फायद्याकरिता त्यांच्याकडून पैसे उकळत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शहराचे हृदयस्थान असलेल्या रामनगर भागातील गौरक्षण वॉर्ड परिसरात नागरिकांना आर्थिक गंडा घालण्यासाठी चक्क बोगस कॉल सेंटर सुरू होते. हा धक्कादायक प्रकार सायबर सेल व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत पुढे आला आहे. या कारवाईदरम्यान रामनगर पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी बनावट कॉल सेंटरमधून १ लाख ८३ हजार ४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
‘रिश्ते गाईड डॉट कॉम साईट’वर बनावट प्रोफाईल बनवून त्यात चुकीची माहिती भरुन ती प्रोफाईल संकेतस्थळावर अपलोड करीत फिर्यादीची बदनामी केल्याची तक्रार पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनीही तांत्रिकदृष्ट्या अधिकची माहिती गोळा करून रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गौरक्षण वॉर्ड भागातील अग्रवाल यांचे घरी भाड्याने सुरू असलेल्या कॉल सेंटरवर छापा टाकला. या ठिकाणच्या काहींना पोलिसांनी ताब्यात घेत चौकशी केली असता, तुषार दिलीप कोल्हे (रा. नागपूर) याने रुचिका दादाराव खोब्रागडे (रा. आमगाव (जं.), ता. सेलू) हिच्यासोबत संगनमताने रिश्ते गाईड डॉट कॉम विवाह संस्थेची फ्रेन्चायसी घेऊन सोशल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मुला-मुलींचे फोटो व वैयक्तिक माहितीची चोरी करून त्यांची बनावट प्रोफाईल तयार करत होते. यासाठी बनावट मोबाईल क्रमांकाचा वापर केला जातो. तसेच ज्या ग्राहकाची पसंती आली, त्यांना खोटी माहिती पुरवून स्वत:च्या फायद्याकरिता त्यांच्याकडून पैसे उकळत होते.
संबंधित काॅल सेंटरचे भरपूर ग्राहक असून, मोबाईल फोनद्वारे माहितीची देवाण-घेवाण करण्यासाठी सहा महिला कामावर ठेवून लग्न जुळवून देतो, असे भासवून लोकांची आर्थिक फसवणूक तसेच बनावट प्रोफाईल तयार करून बदनामी केली असल्याचे पुढे आल्याने पोलिसांनीही बनावट कॉल सेंटरमधून सात साधे, तर चार ॲन्ड्राॅईड मोबाईल, ३८ हजार ४९० रुपये रोख, चार संगणक संच, मोबाईल चार्जर, २१ रजिस्टर आदी एकूण १ लाख ८३ हजार ४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई सहा. पोलीस निरीक्षक महेंद्र इंगळे, अमोल लगड, बालाजी लालपालवाले, गजानन लामसे, नीलेश कट्टोजवार, यशवंत गोल्हर, दिनेश बोथकर, विशाल मडावी, अनुप कावळे, अक्षय राऊत, रितेश शर्मा, राजू जयसिंगपुरे, अंकित जिभे, शाहीन सय्यद, स्मिता महाजन यांनी केली.