बनावट कॉल सेंटर आणि संकेतस्थळावरून अनेकांना गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2017 12:11 AM2017-11-06T00:11:23+5:302017-11-06T00:11:42+5:30
बनावट कॉल सेंटर चालवून व बनावट संकेतस्थळाच्या मदतीने बेरोजगार युवकांना लुटणाºया मास्टर मार्इंडला दिल्ली येथून वर्धा येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : बनावट कॉल सेंटर चालवून व बनावट संकेतस्थळाच्या मदतीने बेरोजगार युवकांना लुटणाºया मास्टर मार्इंडला दिल्ली येथून वर्धा येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. विपुल विनोद अरोरा (२१), तसेच हिमांशू रवी अरोरा (२४) दोन्ही रा. दिल्ली अशी अटकेतील आरोपींची नावे असल्याचे सांगण्यात आले.
पोलीस सूत्रांनुसार, १८ सप्टेंबर २०१७ ला शेख आबीद हुसैन शेख खुर्शीद याला तब्बल १.६० लाख रुपयांचा आॅनलाईन गंडा घालण्यात आला होता. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून सदरचा गुन्हा नोंद करून तपास सुरू करण्यात आला. तपासादरम्यान मिळालेल्या सुगाव्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दिल्ली येथे रवाना झाले. येथे तांत्रिक माहितीवरून एका मोबाईल दुकानातून एक व्यक्ती दुसºयाच्या नावाने सीम विकत घेवून ते कार्ड कॉल सेंटरमध्ये वापरण्याकरिता घेवून जातो अशी माहिती मिळाली. त्या आधारे सदर दुकानाजवळ सापळा रचून विपुल विनोद अरोरा याला ताब्यात घेण्यात आले. त्याला पोलिसी हिसका दाखविला असता त्याने कॉल सेंटरचा मालक हिमांशू अरोरा बाबतची माहिती दिली. या माहितीवरून त्यालाही अटक करून वर्धेत आणण्यात आले. सदर दोन्ही आरोपींच्या ताब्यातून बनावट कॉल सेंंटरवर वापरलेले एकूण ३० मोबाईल, चार्जर, बॅग व कार्यालयाचे कागदपत्र असा एकूण १ लाख ९२ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या दोघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना सहा दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने ठोठावली असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केलेल्या सदर दोन्ही आरोपींकडून आणखी काही गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस यांच्या मार्गदर्शनात तपासी अधिकारी रामनगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय मगर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पराग पोटे, सहायक पोलीस निरीक्षक सचिन यादव, पीएसएय उचल मलकापुरे, सहायक फौजदार नामदेव किटे, पांडुरंग कामटे, जमादार नरेंद्र डहाके, वैभव कट्टोजवार, आकाश चुंगडे, अमित शुक्ला, सागर सांगोळे, नरेंद्र कांबळे, सचिन खैरकर, शिल्पा राऊत यांनी केली. तसेच कुलदीप टांकसाळे, दिनेश बोथकर, अनूप कावळे, अक्षय राऊत, निलेश कट्टोजवार यांनी तांत्रिक सहाय्य केले. खोटी बतावणी करणाºयांवर नागरिकांनी विश्वास ठेऊ नये, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.