बनावट नोटांचा मास्टर माईंड ‘ओमप्रकाश’ इंदोरमधून अटक
By चैतन्य जोशी | Published: April 4, 2023 05:31 PM2023-04-04T17:31:04+5:302023-04-04T17:31:59+5:30
पोलिसांकडून टोळीचा पर्दाफाश : दुसरा आरोपी दिल्लीतून गजाआड
वर्धा : बनावट नोटां चलन करणाऱ्या चौघांना वर्धा पोलिसांनी अटक केली होती. बनावट नोटा प्रकरणांत पोलिसांच्या विविध पथकांनी तपास करीत अंकुश कुमार मनोज कुमार रा. बुलंदशहर उत्तरप्रदेश याला दिल्लीतून अटक केली. अखेर अंकुशने बनावट नोटा इंदोर येथून आणल्याचे समोर येताच पोलिसांनी थेट इंदोर गाठून बनावट नोटांचा मास्टर माईंड ओमप्रकाश भगवान लालवानी (२३) याला अटक केली. बनावट नोटा चलन प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत सहा आरोपींना बेड्या ठोकून टोळीचा पर्दाफाश केला.
काही तरुण बनावट नोटा चलणात आणत असल्याची माहिती शहर पोलिस ठाण्यातील कर्मचारी दिनेश तुमाने यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी निखील लोणारे, स्वप्नील उमाटे, प्रितम हिवरे, साहील साखरकर यांना १७ मार्च रोजी अटक केली होती. त्यांच्याकडून तब्बल ५०० रुपयांच्या ९४ हजारांच्या बनावट नोटा जप्त केल्या होत्या. त्यांनी दिल्ली येथील राज नामक व्यक्तीने ५० हजार रुपयांच्या बदल्यात १ लाख २० हजारांच्या बनावट नोटा दिल्याचे सांगितले. पोलिसांनी तत्काळ शोध घेऊन दिल्ली येथून अंकुश कुमार मनोज कुमार (२०) याला २३ मार्च रोजी अटक केली. त्याच्याकडून १ लाख १० हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या. पोलिस कोठडी दरम्यान त्याने बनावट नोटा ओमप्रकाश भगवान लालवानी रा. इंदोर याने पुरविल्याची माहिती दिली. पोलिसांनी इंदोर येथे जात मास्टरमाईंड ओमप्रकाश याला अटक केली.
ही कारवाई पोलिस अधीक्षक नुरुल हसन, अप्पर पोलिस अधीक्षक सागर कवडे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक सत्यवीर बंडीवार यांच्या निर्देशात पोलिस उपनिरीक्षक सलाम कुरेशी, दिनेश तुमाने, जगदीश गराड, अनुप राऊत, राहुल भोयर, नितीन इटकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप कापडे, विशाल मडावी, अंकित जिभे यांनी केली.
लॅपटॉपसह कलर प्रिंटर जप्त
पोलिसांनी इंदोर येथे जात बनावट नोटा छपाईसाठी वापरलेला लॅपटॉप, दोन कलर प्रिंटर, ५,५०० रुपयांच्या बनावट नोटा तसेच ५०० रुपयांच्या ४२८ बनावट नोटा २ लाख १४ हजार रुपये जप्त केले. तसेच दिल्ली येथील आरोपीकडून १ लाख १० हजारांच्या बनावट नोटा जप्त केल्या.
राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणांकडे सोपविणार तपास
बनावट नोटां या इतर देशांतून येत असल्याने तसेच नोटा तयार करणाऱ्या कागदाची आरोपी ओमप्रकाश याने ‘टेलिग्राम’ अॅप डाऊनलोड करुन त्या ग्रुपवर मेसेज टाकून मागणी केल्याचे निष्पन्न झाले. मागील तीन महिन्यांपासून हा प्रकार सुरु होता. नोटा बनविण्यासाठी लागणारा कागद हा इतर देशातून येत असल्याचा संशय असल्याने तसेच इतर देशांसोबत याचे धागेदोरे असल्याने हा तपास एनआयए तसेच एटीएसकडे सोपविणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी दिली आहे.