उबदा येथील सरपंचाच्या घरी बनावट दारूचा कारखाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 01:37 AM2017-08-19T01:37:01+5:302017-08-19T01:37:18+5:30
मध्यप्रदेशातील दारू आणून ती रिकाम्या बाटलीत भरून तिला मागणी असलेल्या कंपनीचे स्टिकर लावून तिची विक्री करणाºया दारूविक्रेत्याना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
समुद्रपूर : मध्यप्रदेशातील दारू आणून ती रिकाम्या बाटलीत भरून तिला मागणी असलेल्या कंपनीचे स्टिकर लावून तिची विक्री करणाºया दारूविक्रेत्याना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. विशेष म्हणजे हा कारखाना उबदा येथील सरपंच अनिकेत कांबळे याच्या घरी होता. या कारवाईत पोलिसांनी एकूण ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून अन्य एक आरोपी फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी उबदा येथील अनिकेत कांबळे याच्या घरी छापा टाकला त्यावेळी मध्यप्रदेशातील दारू वर्धेत आणून ती इतर बाटलीत टाकून त्याला महाराष्ट्राचे लेबल व सील लावून त्याची विक्री केल्या जात असल्याचे पुढे आले. उबदा येथील सरपंच अनिकेत कांबळे याच्या घरी समुद्रपूरचे ठाणेदार प्रवीण मुंडे, सहाय्यक फौजदार उमेश हरणखेडे व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा टाकून अनिकेत कांबळे याला ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पोलिसांनी मध्यप्रदेशातील ७५० मिलिच्या दारूच्या २४ शिश्या विविध कंपन्यांचे स्टीकर व झाकने तसेच दारूच्या बाटला सील करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य असा एकूण ६४ हजार ९९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सदर प्रकरणातील दुसरा आरोपी संजय थूल रा. उबदा हा फरार असून त्याचा शोध सुरू आहे.
कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस, अपर पोलीस अधीक्षक चिन्मय पंडीत यांच्या मार्गदर्शनात गुन्हे एलसीबीचे निरीक्षक पराग पोटे, पंकज पवार, नामदेव किटे, वैभव कट्टोजवार, अमित ठाकूर, जाधव, भूषण पूरी, नामदेव चाफले, चंद्रशेखर रोहणकर, वाटकर, विरेंद्र कांबळे यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केली.