जिल्ह्यात ५०० वर तळ्यांची नोंद
By admin | Published: March 20, 2016 02:14 AM2016-03-20T02:14:15+5:302016-03-20T02:14:15+5:30
मागेल त्याला शेततळे योजनेत आॅनलाईन नोंदणी करण्यासाठी तहसील कार्यालयात आयोजित शेततळे ...
मागेल त्याला शेततळे योजना : हिंगणघाट, समुद्रपूर, आष्टी तालुक्याची आघाडी
वर्धा : मागेल त्याला शेततळे योजनेत आॅनलाईन नोंदणी करण्यासाठी तहसील कार्यालयात आयोजित शेततळे नोंदणी शिबिरास जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळत आहे. महसूल व कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे. शनिवारी आयोजित शिबिरात दुपारपर्यंत सुमारे ५०० शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत.
शेततळ्यांच्या माध्यमातून पिकांना संरक्षित सिंचन देण्यासाठी पाण्याची उपलब्धता व्हावी, तसेच उत्पादन वाढण्यासोबतच पावसाचा खंड पडल्यास पिकांना जीवनदान मिळावे म्हणून शेततळे ही संकल्पना अत्यंत उपयुक्त आहे. यामुळे शासनाने शेततळे बांधकामासाठी ५० हजार रुपयांपर्यंत अनुदान जाहीर केले आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या मागणीनुसार शेततळे मिळणार असून अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या थेट बॅँक खात्यात जमा होणार आहे. शेतकऱ्यांसाठी उपयुक्त योजना असल्याने तालुकास्तरावर दोन दिवसांचे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी दिली.
मागेल त्याला शेततळे या योजनेंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या देवळी तहसील कार्यालयातील शिबिराला जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी भेट देऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. शेततळे योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. देवळी तालुक्यातील १५० गावांत ही योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी महसूल व कृषी विभागातर्फे ग्रामपंचायतस्तरावर विशेष मोहीम राबविण्यात आली आहे. चोंडी येथील शेतकरी दिनेश लोहबे यांनी शेततळ्यासाठी सर्वप्रथम अर्ज सादर करून या विशेष अभियानाचा शुभारंभ केला. लोहबे या शेतकऱ्याकडे सात हेक्टर जमीन असून कापूस, सोयाबीन व तूर ही पिके ते घेतात. यामुळे कापूस व सोयाबीनसाठी संरक्षित सिंचनाच्या दृष्टीने शेततळी बांधण्याचा संकल्प त्यांनी केला आहे. सोबतच उत्तम डिघोळे, मंगेश येंडे, अंबादास येंडे, माणिक काळे, दिलीप कैलुके, विजय कैलुके आदी शेतकऱ्यांनीही शेततळ्यांसाठी अर्ज केले आहेत.
शेततळे योजनेच्या विशेष शिबिरामध्ये शनिवारी दुपारपर्यंत हिंगणघाट येथे सर्वाधिक १०३ शेतकऱ्यांनी अर्ज सादर केले. समुद्रपूर येथे ८६, आष्टी ५० तसेच कारंजा, आर्वी, सेलू आणि वर्धा तालुक्यात ३० ते ४० शेतकऱ्यांनी शेततळ्यासाठी मागणी अर्ज सादर केले आहेत. सायंकाळपर्यंत या शिबिरांमध्ये शेतकऱ्यांनी आपली मागणी नोंदविली असून रविवारी (दि.२०) सकाळी १० ते सायंकाळपर्यंत शिबिराच्या माध्यमातून नोंदणी करण्यात येणार आहे. अनियमित पावसामुळे पिकांचे नुकसान रोखण्यास शेततळे उपयोगी ठरणार आहेत. यामुळे या योजनेमध्ये जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी सहभागी होत शेततळ्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी केले आहे.(कार्यालय प्रतिनिधी)
विशेष शिबिरांना शेतकऱ्यांचा प्रतिसाद
शासनाने मागेल त्याला शेततळे ही योजना सबंध राज्यात लागू केली आहे. या योजनेसाठी जिल्हाभर विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. या योजनेला शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळत असून ५०० वर शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. यात सर्वाधिक अर्ज हिंगणघाट, आष्टी आणि समुद्रपूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी केले आहेत. कारंजा, आर्वी, सेलू आणि वर्धा तालुक्यातील शेतकऱ्यांकडूनही शेततळ्यांसाठी अर्ज करून नोंदणी केली जात असल्याचे सांगण्यात आले.
विदर्भात अनियमित पावसामुळे गत काही वर्षांपासून कापूस, सोयाबीन पिकांचे नुकसान होत आहे. हे नुकसान टाळण्याकरिता शेततळे उपयोगी पडणार आहेत. यामुळेही जिल्ह्यातील शेतकरी शेततळे योजनेचा ला घेण्यासाठी पुढाकार घेत असल्याचे दिसून येते.