किसान सन्मान योजनेवर संभ्रमाचे सावट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 12:25 AM2019-02-25T00:25:04+5:302019-02-25T00:26:33+5:30
शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली. या योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दोन हजार रुपयांचा पहिला हप्ता रविवारी एकाचवेळी वळता करण्यात आला. परंतु, जिल्ह्यात आचारसंहिता असल्याने शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला की नाही? याबाबत सायंकाळी उशिरापर्यंत संभ्रमाचे वातावरण होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली. या योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दोन हजार रुपयांचा पहिला हप्ता रविवारी एकाचवेळी वळता करण्यात आला. परंतु, जिल्ह्यात आचारसंहिता असल्याने शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला की नाही? याबाबत सायंकाळी उशिरापर्यंत संभ्रमाचे वातावरण होते.
शेतकºयांना दिलासा मिळण्याकरिता शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत दोन हेक्टर धारणक्षेत्र असणाºया शेतकरी कुटुंबाला प्रतिवर्षी ६ हजार रुपये आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्याची घोषणा केली होती. या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना तीन टप्प्यात मिळणार आहे. प्रत्येक टप्प्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दोन हजार रुपये जमा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यानुसार या योजनेचा लाभ घेण्यासाठी अल्प व अत्यल्प भूधारक शेतकºयांनी अद्ययावत माहिती तलाठ्यांकडे उपलब्ध करून देण्याचे आवाहन करण्यात आले होते. तलाठ्यांनी काढलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात १ लाख ३ हजार लाभार्थी शेतकरी असून त्यापैकी ७० हजार लाभार्थी शेतकऱ्यांच्या नावाची सर्व कागदपत्रानिशी नोंदणी करण्यात आली आहे. शेतकऱ्यांची नावे, बँक डिटेल्स, आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक यासोबतच शासनाकडे असलेली यादी तपासल्यानंतर सध्या ९ हजार ७९ शेतकरी लाभार्थी या योजनेच्या लाभासाठी पात्र ठरले आहेत. त्यामुळे रविवारी मिळालेल्या लाभामध्ये या शेतकºयांच्या बँक खात्यात दोन हजार रुपये रक्कम जमा होणे अपेक्षित होते. मात्र, सायंकाळी उशिरापर्यंत किती शेतकऱ्यांना लाभ मिळाला, याबाबत माहिती जाणून घेतली असता प्रशासनाने दुजोरा दिला नाही. त्यामुळे अनुदान मिळालेल्या शेतकऱ्यांची संख्या प्राप्त झाली नाही.
तर तीन महिने करावी लागणार प्रतीक्षा
जिल्ह्यातील ५१९ ग्रामपंचायतींपैकी २९८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका असल्याने वर्धा जिल्ह्यातच आचारसंहिता लागू झाली आहे. जिल्हाभरातच आचारसंहिता असलेला वर्धा जिल्हा हा राज्यातील एकमेव जिल्हा असल्याने या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा’ लाभ मिळणार की नाही? अशी शंका उपस्थित करण्यात आली आहे. जर आचारसंहितेमुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला नाही, तर लाभार्थ्यांना तब्बल तीन महिने प्रतीक्षा करावी लागणार आणि योजनेचा लाभ न मिळणारा वर्धा हा राज्यातील एकमेव जिल्हा ठरेल.
या योजनेची घोषणा पूर्वीच झाली असून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा करण्यात येणार आहे. लोकप्रतिनिधींच्या अनुपस्थितीतच जिल्ह्यात हा कार्यक्रम राबविण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या आचारसंहितेचा या योजनेच्या लाभावर परिणाम पडणार नाही. आता लाभ मिळाला की नाही? याची माहिती शेतकऱ्यांकडून घ्यावी लागणार असल्याने ती अद्याप कळू शकली नाही. प्रत्येक तहसीलदारांकडून माहिती घेण्याचा प्रयत्न सुरू आहे.
-उत्तम दिघे, उपविभागीय अधिकारी, वर्धा.
महसूल विभागाचा लागला कस
सदर योजनेची तात्काळ अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामस्तरावर समिती गठित करण्यात आली असून तलाठी हा त्या समितीचा प्रमुख आहे. ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, सेवा सहकारी संस्थेचे सचिव हे समितीचे सदस्य आहेत. ग्रामस्तरावरील सदर समिती पात्र कुटुंबांची निश्चिती करीत आहे. यामध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांचे बँक खाते, आधार क्रमांक, मोबाईल क्रमांकांची माहिती गोळा केली जात आहे.
यापूर्वी विविध योजनांचे थेट अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले असल्याने बºयाच शेतकरी खातेदारांची माहिती उपलब्ध आहे. त्यानुसार १२ फेब्रुवारीपर्यंत सदर माहिती संकलित करून गावनिहाय यादी प्रसिद्ध करण्यात आली. तसेच अंतिम यादी शासनाकडे पाठविण्यात आली आहे. उर्वरित शेतकऱ्यांची माहिती अपलोड केली जात असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.