बाजारात दहाच्या ‘नकली’ नाण्यांचा गोंधळ
By admin | Published: January 14, 2017 01:31 AM2017-01-14T01:31:21+5:302017-01-14T01:31:21+5:30
केंद्र शासनाने ८ नोव्हेंबर रोजी ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या. या मोबदल्यात नवीन
बँकांत माहितीचा अभाव : खरी-खोटी नाणी ओळखणे कठीण
वर्धा : केंद्र शासनाने ८ नोव्हेंबर रोजी ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या. या मोबदल्यात नवीन दोन हजार आणि ५०० रुपयांच्या नोटा बाजारात आल्या. या नोटबंदीच्या निर्णयामुळे बाजारपेठेत अस्थिरता निर्माण झाली. या पाठोपाठ दहा रुपयांची नाणी खरी-खोटी असल्याची अफवा बाजारात पसरली. परिणामी, प्रत्येकाने दडवून ठेवलेली नाणी बाजारात काढली. यातच एका बँकेने नाणी नकली असल्याचे सांगितल्याने मार्केटमधील ‘नकली’ नाण्यांचा गोंधळ सुरू झाल्याचे चित्र आहे.
देशात भ्रष्टाचार बोकाळला आहे. अनेकांकडे काळा पैसा साठविलेला आहे. भ्रष्टाचार कमी करीत काळा पैसा बाहेर काढण्याचा उपाय म्हणून नोटबंदीचा निर्णय घेण्यात आला. या माध्यमातून ५००, १००० रुपयांच्या नकली नोटाही आपोआप चलनातून बाद होतील, असे ठाम मत मांडण्यात आले होते. तसे झालेही; पण नवीन नोटाही नकली आढळून आल्याने खळबळ माजली. नोटबंदीच्या निर्णयामुळे बाजारात अस्थिरता असताना, गोरगरीब, सामान्य नागरिक, शेतकरी, शेतमजूर यांचे व्यवहार ठप्प झालेले असतानाच नकली नाण्यांच्या अफवांनाही पेव फुटले.
नागपूरसारख्या ‘मेट्रोसिटी’मध्येही दहा रुपयांची नाणी नकली असल्याचा कांगावा करीत ती बाजारात काढली गेली. या पाठोपाठ अन्य लहान-मोठ्या शहरांतही दहा रुपयांची नाणी स्वीकारण्यास सामान्य, लहान व्यावसायिक यांच्याकडून नकार मिळू लागला. परिणामी, नोटबंदीच्या निर्णयामुळे आलेली अस्थिरता आणखीच भयावह झाली. खरोखरच दहा रुपयांची नाणी नकली असतील काय, असा प्रश्न सामान्य एकमेकांना विचारताना दिसून येत आहे. सध्या दहा रुपयांची ही नाणी काही नागरिक स्वीकारत असले तरी त्यातील खरे-खोटेपणा कसा ओळखायचा, या बाबी अद्याप कुणाच्या गावातही नाहीत. यातच देवळी शहरामध्ये एका व्यक्तीला त्यांच्याकडील दहा रुपयांची दहा नाणी नकली असल्याचे सांगण्यात आले. या कारवाईत संबंधित इसमाचे १०० रुपयांचे नुकसान झाले; पण ती नाणी खोटी असल्याचे बँकेकडून सांगण्यात आले.
देवळी शहरात घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांत खऱ्या-खोट्या नाण्यांबाबतची स्थिती आणखीच गोंधळाची झाल्याचे चित्र आहे. बँकांमध्येही दहा रुपयांच्या खऱ्या आणि खोट्या नाण्यांबाबत माहिती वा नोटिफिकेशन उपलब्ध नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. रिझर्व्ह बँकेने कुठलीही नाणी खोटी नाहीत, असे नोटिफिकेशन काढले होते; पण देवळीमध्ये झालेल्या कारवाईमुळे ऐकावे कुणाचे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. रिझर्व्ह बँकेसह राष्ट्रीयकृत तसेच खासगी बँकांनी बाजारातील गोंधळ आणि नागरिकांमध्ये असलेला संभ्रम दूर करण्यासाठी जागृती करणे गरजेचे झाले आहे.(कार्यालय प्रतिनिधी)
४चलनामध्ये असलेली सर्वच नाणी खरी असल्याचे नोटिफिकेशन यापूर्वी रिझर्व्ह बँकेने काढले आहे. राष्ट्रीयकृत बँकेतील अधिकारीही यावरच ठाम आहेत. दहा रुपयांच्या खऱ्या-खोट्या नाण्यांबाबत त्यानंतर कुठल्याही सूचना नाहीत, दहा रुपयांची नाणी सर्व खरीच आहेत, नकली नाहीत, असे बँकांच्यावतीने सांगण्यात येत आहे. असे असेल तर मग, देवळीतील बडोदा बँकेने परत केलेली दहा रुपयांची दहा नाणी खोटी होती काय, हा प्रश्नच आहे. यात संबंधित ग्राहकाला १०० रुपयांचा फटका तर बसला; पण नाणी खरी की खोटी, हा संभ्रम दूर झाला नाही. परिणामी, बँकेतील अधिकाऱ्यांच्या त्या वक्तव्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
काही समज, गैरसमज
४दहा रुपयांची सर्वच नाणी खरी असल्याचे आरबीआय ठासून सांगत असताना बडोदा बँकेने दहा नाणी खोटी ठरविली. नाण्यांवर दहा हा आकडा मध्यभागी मोठ्या अंकात लिहून असलेली नाणी खोटी असल्याचे सांगितले जात आहे. शिवाय दहापेक्षा अधिक रेषा असलेली नाणीही खोटी असल्याचे सांगितली जात आहे. असे असले तरी बाजारामध्ये बहुतांश नाणी अशाच प्रकारची नाणी आढळून येतात. मग, यातील खरी आणि खोटी नाणी कोणती, हे कोण सांगणार, हा प्रश्नच आहे. यावर बँकांनीच उत्तर शोधणे गरजेचे झाले आहे.
बँकेचे अधिकारी ठामच
४दहा रुपयांची कोणती नाणी खरी आणि कोणती खोटी हे कसे ओळखावे, याबाबत काही बँकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना विचारणा करण्यात आली; पण खोटी नाणी नाहीत. बाजारात असलेली दहा रुपयांची सर्व नाणी आरबीआयच्या मते खरीच आहे. प्रत्येक वर्षी या नाण्यांची निर्मिती करण्यात आली, अशी माहितीही अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून देण्यात आली.