निराधारांनी केला पालकमंत्र्यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2019 10:14 PM2019-06-23T22:14:24+5:302019-06-23T22:15:07+5:30
निराधारांच्या अनुदानात भरघोस वाढ केल्याबद्दल रविवारी निराधारांनी राज्याचे अर्थमंत्री तथा वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा जाहीर सत्कार केला. राज्य शासनाच्या अर्थसंकल्पात ना. सुधीर मुनगंटीवार यांनी निराधारांच्या अनुदानात ४०० ते ६०० रुपयांची वाढ केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : निराधारांच्या अनुदानात भरघोस वाढ केल्याबद्दल रविवारी निराधारांनी राज्याचे अर्थमंत्री तथा वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा जाहीर सत्कार केला.
राज्य शासनाच्या अर्थसंकल्पात ना. सुधीर मुनगंटीवार यांनी निराधारांच्या अनुदानात ४०० ते ६०० रुपयांची वाढ केली. त्याबद्दल निराधारांच्यावतीने सत्कार समारंभाचे आयोजन आ. डॉ. पंकज भोयर यांच्या जनसंपर्क कार्यालयात करण्यात आले होते. याप्रसंगी आ. डॉ पंकज भोयर, माजी खासदार दत्ता मेघे, भाजपचे जिल्हा अध्यक्ष राजेश बकाने, शहर अध्यक्ष प्रशांत बुरले आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी संजय गांधी निराधार योजना अशासकीय समिती वर्धा शहरच्यावतीने मुनगंटीवार यांचा सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना ना. मुनगंटीवार म्हणाले की, देशातील प्रत्येक व्यक्ती हा आधी भारतीय आहे. प्रत्येकाला न्याय देण्याचा प्रयत्न केंद्र व राज्य सरकार करीत आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात निराधार योजनेत भरीव वाढ करण्यात आली. यापूर्वी ६०० रुपये दरमहा भत्ता दिला जात होता. आता त्यात वाढ करण्यात आली असून १,००० व १,२०० रुपये दिल्या जाणार आहे. अनुदान वाटप करताना प्रशासनाकडून विलंब होत होता. पाच-सहा महिन्यांचे अनुदान थकविल्या जात होते; पण आता असे होणार नाही. येत्या दिवाळी पासून दरमहा अनुदान दिल्या जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली. जे तहसीलदार अनुदान देण्यास टाळाटाळ करतील त्यांच्या वेतनातून व्याजाची रक्कम वसूल करण्यात येईल. शिवाय त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असेही यावेळी त्यांनी सांगितले. ८० टक्के पेक्षा अधिक दिव्यांग असलेल्या व्यक्तीला घर देण्याचा निर्णय झाल्याचे त्यांनी सांगितले. महिलांना स्वयम रोजगार उपलब्ध करण्यासाठी २०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. दिव्यांगांना दुकान देऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यात येणार असल्याचे ना. मुनगंटीवार यांनी सांगितले. यावेळी आ. डॉ. पंकज भोयर यांनीही मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी भाजपाचे पदाधिकारी, नगरसेवक, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, दिव्यांग व परिसरातील नागरिक उपस्थित होते. संचालन आशिष कुचेवार यांनी केले.