शासन व पोलिसांच्या जाचामुळे साऊंड व्यावसायिकांची उपासमार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 10:26 PM2017-08-12T22:26:03+5:302017-08-12T22:26:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : सामूहिक लाऊड स्पीकर व संबंधित व्यावसायिकांना पोलिसांकडून नाहक त्रास होत आहे. शिवाय विविध नियमांमुळे व्यवसायच संकटात आल्याने या व्यावसायिकांची उपासमार होत आहे. याचा व्यावसायिकांनी राज्यभर निषेध नोंदविला असून कार्यवाहीची मागणी केली आहे. याबाबत उपविभागीय अधिकाºयांना निवेदन देण्यात आले.
लाऊडस्पीकर साऊंड, इलेक्ट्रीकल्स अॅण्ड जनरेटर, मंडप डेकोरेशन, कॅटरींग, बिछायत यांच्यावर साऊंड बंदी, सार्वजनिक उत्सवावर शासनांकडून येणारी जाचक बंधणे यामुळे उपासमारीची वेळ येत आहे. शासनाच्या आदेशावरून पोलिसांकडून व्यावसायीकांवरील अन्याय व अत्याचार वाढत आहे. फौजदारी कारवाई, अमानुष मारहाण, अत्यावश्यक इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करणे, आदेशाचे पालन केल्यावरही आर्थिक व मानसिक अत्याचार वाढत आहे. तालुक्यात सुशिक्षित बेरोजगार हा व्यवसाय करतात. त्यांची पोलिसांकडून सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांत गळचेपी केली जात आहे. लोकजागरण वा सांस्कृतिक, धार्मिक उत्सवात साऊंड वाजविण्यावर प्रदूषण कायदानुसार बंदी घातली जात आहे. यामुळे उपासमार होत आहे. याकडे लक्ष देत उपाययोजना करावी, अशी मागणी उमेश डेकोरेशन, न्यू पिसे, वाडकर, डिलक्स साऊंड सर्विस, गोपाल डेकोरेटर्स आदींनी निवेदनातून केली आहे.