शेतमालाचे भाव उत्पादन खर्चावर आधारित असावेत
By admin | Published: March 28, 2016 02:09 AM2016-03-28T02:09:28+5:302016-03-28T02:09:28+5:30
आजच्या बाजारपेठेत कारखानदार ते व्यापाऱ्यांपर्यंतचे उत्पादक नफ्याचे गणित मांडून वस्तूंचे भाव ठरविताना दिसतो.
वर्धा : आजच्या बाजारपेठेत कारखानदार ते व्यापाऱ्यांपर्यंतचे उत्पादक नफ्याचे गणित मांडून वस्तूंचे भाव ठरविताना दिसतो. या ‘हाय कॉस्ट इकॉनॉमी’त शेतकऱ्याला मात्र स्वत:च्या श्रमातून व अतिकष्टाने उत्पादित केलेल्या मालाचा भाव ठरविता येत नाही. ही आजच्या बाजारपेठेतील मोठी विसंगती आहे. शेतमालाचा भाव शेतीच्या उत्पादन खर्चावर आधारित असावा. शेतकऱ्याने उत्पादित केलेल्या मालाची किंमत त्याला ठरविता यावी, असे मत शेतकरी नेते किशोर माथनकर यांनी व्यक्त केले.
रेशीम उद्योग आणि जैविक किड व्यवस्थापन केंद्र, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ व यशवंत महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने रेशीम उद्योग व मधमाशी पालन तंत्रज्ञान शेतकरी कार्यशाळेच्या समारोप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. विलास देशमुख होते. प्रमुख पाहुणे म्हणून सी.एस.बी.आर. चे समन्वयक डॉ. एम.एम. राय, प्रा. डॉ. एम. के. राठोड उपस्थित होते.
पुढे बोलताना माथनकर म्हणाले, बाजारपेठेत वस्तूंची मुळ किंमत दुकानदारास देणारे ग्राहक शेतमालाच्या किंमतीबद्दल भावबाजी करताना दिसतात. ही मानसिकता बदलली पाहिजे. शेतकऱ्यालाही त्याच्या मालाचा योग्य भाव व श्रमाचा मोबदला मिळाला पाहिजे, असे सांगितले. यानंतर बोलताना डॉ. राय व डॉ. एम.के. राठोड यांनी मनोगत व्यक्त केले. रेशीम उद्योग व जैविक किड व्यवस्थापन केंद्राकडून शेतकऱ्यांना सहकार्य करण्याचे सांगितले.
मंचावर यशवंत ग्रामीण संस्थेचे उपाध्यक्ष सतीश राऊत उपस्थित होते. कार्यशाळेला महाविद्यालयाचे विद्यार्थी, नागपूर येथील रेशीम उद्योग पदविका अभ्यासक्रमाचे विद्यार्थी व संशोधक उपस्थित होते. समारोपीय कार्यक्रमाचे संचालन डॉ. विजय बोबडे यांनी केले. आभार प्रा. प्रमोद नारायणे यांनी मानले. यावेळी शेतकऱ्यांच्या प्रमाणपत्रांचे वितरण करून कार्यशाळेची सांगता केली.
कार्यशाळेच्या आयोजनाला डॉ. उत्तम पारेकर, प्रा. डी.व्ही. भोयर, डॉ. विलास ढोणे, प्रा. डी.पी. देशमुख, डॉ. कल्पना कुलकर्णी, प्रा. विशाल पाटील, प्रा. आर.के. मेसेकर, प्रा. एस.डी. रायपुरे, प्रा. पी.डी. हिवरकर, प्रा. के.बी. चंदनकर, प्रा. सी.एस. धोटे, प्रा. डी.एस. महाजन, सुशांत धोपटे, प्रा. पी.डी. हिवरकर, प्रा. के.बी. चंदनकर, प्रा. सी.एस. धोटे, प्रा. डी.एस. महाजन व आदींनी सहकार्य केले.(स्थानिक प्रतिनिधी)